समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णूपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व मे | म्हणजेच हे पृथ्वी माते तुला पायानी स्पर्श करण्याबद्दल मला क्षमा कर अशी तिची क्षमा मागणारी, पृथ्वीला माता मानणारी आपली परंपरा.

सकाळी गादीतून उठताना देवाला हात जोडावेत आणि त्याच्याच सत्कृपेने आजचा दिवस उगवला आहे असे मानावे. काय होते त्यातून तर मीपणा आणि अहंकार नाहीसा व्हायला मदत होते.

आंघोळ करताना गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती | नर्मदे सिंधू कावेरी जलेSस्मिन् संनिधिं कुरु || हा मंत्र म्हणायचा ज्यायोगे जणू सगळ्या पवित्र नद्यांचं पाणी आपल्याला स्वच्छ करते आहे या कल्पनेने शरीराबरोबर मनही साफ होते.

भोजन:

जेवताना जनी भोजनी नाम वाचे वदावे हा मंत्र म्हणायचे प्रयोजन म्हणजे अन्नपचन हे आपल्या शरीराचे एक प्रकारे यज्ञकर्मच आहे आणि त्याची सांगता व्यवस्थित व्हावी हे देवाकडे साकडे.

पानाभोवती पाणी फिरवावे कारण पूर्वी शेणाने सारवलेल्या जमिनी आणि खाली बसून जेवताना किडा मुंगी जवळ येऊ नये म्हणून पाणी शिंपडायचे. परंतु त्यांनाही खायला मिळावे म्हणून मग भाताची चित्राहुती ठेवायची. जेवण झाल्यावर अन्नदाता, सदाभोक्ता, पाककर्ता सुखी भव असे म्हणावे. केवढा उदात्त विचार! खरंच विचार केला तर या तिघांपैकी कोणी एक जरी नसेल तरी चालणार नाही.

फणसाचे गरे खाल्यावर पान खाऊ नये. पूर्व भारतातील राज्यात हे प्रामुख्याने बोलले जाते. काहीतरी केमिकल रीऍक्शन होऊन प्रचंड पोटात दुखते; काही वेळा ऑपरेशन करायची पण वेळ आली आहे. मासे/कोळंबी आणि दुधाचे पदार्थ एकत्र खाऊ नये. ऍलर्जी होण्याची अथवा घसा खवखवण्याची दाट शक्यता. मासे खाणाऱ्या सारस्वत अथवा सीकेपी लोकांकडे ही गोष्ट आज देखील लक्षात येते. ताक आणि तुरीचे वरण अथवा आमटी एकत्र खाऊ नये. Hyper Acidity होते असे लक्षात आले आहे. (मराठी म्हण – ताकास तूर लागू देऊ नये याचे उगमस्थान इथे आहे). ही संपूर्ण वैद्यकीय कारणे आहेत. पण हल्ली होतं काय की पटकन गोळी खाऊन बरे होणे ह्याची आपल्याला सवय झाली आहे. खरं विचार करायचा तर त्रास जर दोन-चार दिवस झाला तर त्या गोष्टी करू नये हे जास्ती अधोरेखित होऊ शकेल.

दैनंदिन जीवन

झोपलेल्या माणसाला प्रदक्षिणा घालू नये, अपमृत्यु येऊ शकतो. अहो तुम्हीच अडखळून पडलात तर एक तर त्या व्यक्तीला लागेल किंवा तुम्हाला इजा होईल. म्हणून काय सांगायचं तर मेलेल्या माणसालाच प्रदक्षिणा घालावी.

बादलीने डोक्यावर पाणी घेऊ नये, मृत्यू संभवतो. पूर्वी बादल्या जड पितळेच्या आणि त्याची कडी आणि बादलीचा काठ यामध्ये बोटे चिमटू शकतात. तसेच ज्याच्यात बादलीची कडी असते ते सुद्धा चांगले धारदार. आता डोक्यावरून पाणी घेताना ती सटकली तर वर्मी घाव होऊ शकतो. म्हणून घातलेली भीती. आणि सगळ्यात महत्वाचे असे बादलीने पाणी घेतले तर त्याचा खूप अपव्यय होतो. आता बादल्या प्लास्टिकच्या आणि त्यातून बरेचसे शहरी लोकं शॉवरखाली आंघोळ करतात त्यामुळे ते आता गैरलागू आहे; पण पाण्याची बचत करणे हे आपले कर्तव्य आजही आहे.

अंगावर कापड शिवू नये कारण प्रेताच्या अंगावर शिवला जातो. कारण सरळ आहे की शिवताना सुई लागू शकते आणि ती जर गंजलेली असेल तर धनुर्वात होऊ शकतो.

डोक्यावर पांघरून घेऊन झोपू नये. तसे झोपलात तर ऑक्सिजन कसा मिळणार? आज जास्त वेळ मास्क लावून किती त्रास होतो याचा तुम्हाला अंदाज आलाच आहे की.

संध्याकाळ नंतर केरकचरा काढू नये: पूर्वी दिवे नव्हते, कंदिलाचा मिणमिणता प्रकाश. कचरा काढताना एखादी मौल्यवान गोष्ट पडलेली असेल तरी ती सुद्धा कचऱ्यात जाईल. बरं, कचरा टाकायला तुम्ही जवळची केरकुंडी गाठणार. आता तिथे विंचू, साप काहीही असू शकते ज्याने जीवावर बेतू शकते.

संध्याकाळी नखं कापू नये, दारिद्र्य येते. हसायला आलं की नाही? पण विचार करा पूर्वी दिवे नव्हते, सेफ्टी नेलकटर्स नव्हती. कुठल्यातरी ब्लेडने नखं कापणार. संध्याकाळी नीट न दिसल्यामुळे कापताना जखम झाली तर तुमचा रोजगार बुडेल आणि तो बुडाला तर काही काळ पैशाची तंगी. त्यातून पुन्हा धनुर्वात व्हायची भीती आहेच.

उंबरठ्यावर उभं राहून शिंकू नये. पूर्वी आजच्या सारखे दीड इंची उंबरठे नव्हते; चांगले मजबूत उंच असायचे कारण साप अथवा विंचू घरात शिरू नये. त्यातून परत दरवाजे बुटके, त्यामुळे आत जायला पाय उंच करून आणि खाली वाकावेच लागेल. याचे मुख्य कारण म्हणजे आत शिरणारा कोणी शत्रू असेल तर डोक्यात मुसळ अथवा सोटा हाणता येईल. दरवाजा बुटका असल्यामुळे तिथे उभं राहून शिंकलात तर कपाळमोक्ष होऊ शकतो.

न कर्त्याचा वार शनिवार. गावातील शेतकऱ्याला अथवा कामकऱ्याला सुट्टी अशी कधीच नसे; 365 दिवस काम. परंतु जसजसे मुसलमान, यहुदी-झोराष्ट्रीयन, ख्रिश्चन लोकं इथे येऊन वसू लागले तेव्हा लक्षात आले की मुसलमान शुक्रवारी, यहुदी शनिवारी आणि ख्रिश्चन रविवारी काम करत नाहीत. तेलाच्या व्यापारात आलेली बहुतांशी लोकं हे इराणियन यहुदी होते जे शनिवारी तेल विकत नसत. तसेच काहीतरी आपल्याकडे झाले असावे. आठवड्यातील एक दिवस आराम; मग काहीच करू नका. नखं अथवा केस कापू नका, प्रवास टाळा इत्यादी अनेक गोष्टी.

विचार करा की त्या कालानुरूप या गोष्टी किती योग्य आणि स्वीकारण्याजोग्या होत्या. पण आपल्याला रूढींची टिंगल करायची झाली आहे सवय. असो, पुढील लेखात काही सामाजिक रुढींवर प्रकाश टाकूया.

(तुम्हाला सर्वांना एक विनंती.. तुमच्या आठवणीतील मुख्य रुढी पद्धती व परंपरा आणि त्यांची मोठ्यांनी सांगितलेली कारणं कळवाल का? उदाहरणार्थ 1. चिचुंद्रीला मारू नये – अपमृत्यु येतो 2. मांजरानी रस्ता ओलांडला तर जरा थांबून मगच पुढे जावे – कामात अडथळा येतो)

एक संकलन करून अभ्यास करायचा आहे.

© यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

#History #Culture #Tradition #Family #Hindu