माझ्या लहानपणी आमचे फॅमिली डॉक्टर आमच्या सोसायटीत राहायचे, पण त्यांच्याशी सहज संवाद साधणे कर्मकठीण काम. ते काही गर्विष्ठ होते असे नाही पण एकेका माणसाचे व्यक्तिमत्वच असे असते की मोकळेपणा वाटत नाही. त्यामुळे मग आम्ही एका होमियोपॅथी डॉक्टरचा हात पकडला पण हे डॉक्टर तर मुलखाचे मुखदुर्बळ. 1986 च्या सुमारास माझा मित्र भालचंद्र उर्फ भाल्या देवधर मला म्हणाला, अरे कसल्या साबुदाण्याच्या गोळ्या खातोस; चल तुला माझ्या मित्राकडे घेऊन जातो. अशा प्रकारे माझी डॉ दीपक यादवशी भेट झाली. सेना भवन जवळ असलेल्या त्याच्या दवाखान्यात गेलो तर फारशी गर्दी नव्हती. भाल्या बरोबर असल्यामुळे आत लगेच बोलावण्यात आले. पहिल्या भेटीतच डॉक्टर एकदम आवडला. मस्त उंच, आणि दिसायला हँडसम. मी भाल्या आणि दीपक यादवकडे बघून म्हटले अरे, तुम्हां दोघांकडे बघून मला तर inferiority complex आला. दोघेही खळाळून हसले.

दीपक म्हणाला तू भाल्याचा मित्र म्हणजे आता माझा पण मित्र त्यामुळे अहो वगैरे म्हणण्याची काही गरज नाही. खरं तर दीपक मला आठ वर्षांनी मोठा पण त्याच्या आग्रहाने एकेरी नावावर आलो. पण माझी बायको काही त्याला अरे तुरे करू शकली नाही. गंमत म्हणजे माझी आई सुद्धा त्याला अहो डॉक्टर म्हणते.

काही महिन्यांनंतर बायकोला घेऊन गेलो तर तुफान गर्दी. वाटलं आज काही खरं नाही; तास दोन तासाची रखडपट्टी होणार. आतमधून एका मागोमाग एक बाई बाहेर पडत होती त्यामुळे आत काय चाललंय ते कळतच नव्हते. थोड्या वेळाने दरवाजा उघडून दीपक उभा आणि सगळे पुरुष चला अशी त्याने आरोळी ठोकली. मला काहीच कळेना काय करावे कारण मी बायकोबरोबर आलो होतो. मला म्हणाला, अरे आत ये आणि एकदम मागे जाऊन बस. सगळ्यांना आधी बघतो. मग त्याचा दरबार चालू झाला. एका मागून एक माणसाला तपासायचे, काहींना बाहेरच्या गोळ्या लिहून द्यायच्या, काहींना स्वतःकडील औषध द्यायचे असा कार्यक्रम चालू होता. शेवटी आम्ही दोघेच उरलो. दीपक म्हणाला, बोल काय झालंय? मी म्हटलं, अरे ही कसली पेशंट बघायची पद्धत? तर म्हणाला, हे बघ, मी आहे एक GP; 90% लोकं सर्दी, खोकला, ताप किंवा पोट बिघडणे याच्यासाठी येतात. एक एक पेशंट बघायला लागलो तर फार वेळ जातो कारण लोक गप्पा मारत बसतात. आणि ही अशी पद्धत माझ्या वडिलांपासून चालू आहे त्यामुळे पेशंटना सुद्धा त्यात काही विचित्र वाटत नाही.

त्याच्या दवाखान्यात गेलं की नवनवीन पैलू लक्षात येतात. कुठल्याही स्थरातील कितीही शेंबडं असलं तरी लहान मुलाला अगदी प्रेमाने मांडीवर बसवून तपासणार. मला खात्री आहे त्यामुळे त्या मुलाच्या आईवडिलांना आपलं मूल योग्य डॉक्टरच्या हाती आहे ह्या विचाराने समाधान होत असणार. प्रत्येकाची सखोल तपासणी, अचूक रोगनिदान आणि योग्य औषध. कोणाचा आजार जरा जास्त वाटला तर तो अजिबात धोका पत्करणार नाही. लगेच कुठल्यातरी डॉक्टरसाठी चिठ्ठी लिहून देणार. एखाद्या पेशंटला बाहेरचं औषध परवडणार नाही हे माहित असेल तर स्वतःकडची सॅम्पल्स देऊन टाकतो. आता इतके पेशंट येत असल्याने सगळ्यांची नावं लक्षात राहत नाहीत त्यामुळे औषध लिहून देतानाचा लाडका प्रश्न, काय नाव ठेवलंय आईवडिलांनी? मला तर असं वाटतं ना की त्याच्याशी बोलूनच निम्म्या लोकांचा आजार बरा होत असावा.

सुरुवातीला काही वर्षे आम्ही दवाखान्यात गर्दी असली की बिल्डिंगच्या आतून मागच्या दरवाजातून आत जायचो पण नंतर फारच लोकांना ते कळायला लागल्यावर दीपकने तो दरवाजा बंदच करून टाकला.

आमचा एक मित्र सर्जन झाला म्हणून मी आणि भाल्या त्याला दीपककडे ओळख करून द्यायला घेऊन गेलो. निघताना त्या मित्राने दीपकला विचारले की तुमचा काही कट द्यायचा असेल तर सांगा. दीपक हसत म्हणाला, अरे हो, माझा कट असतो ना. मी जर एखाद्या पेशंटचे ऑपरेशन फुकट करायला सांगितले तर ते करायचे आणि तोच माझा कट.

दीपक हा बोलण्यात माझ्यासारख्या कोकणस्थ ब्राह्मणाला शोभेल असा फटकळ. जे लोकं त्याला नवीन भेटतात त्यांना कधीकधी कळत नाही की हा डॉक्टर असे काय बोलतो. परंतु त्याच बरोबरीने तो अत्यंत विनोदी देखील आहे. त्याचे एक दोन नमुने.

  • माझा एक मित्र पाठच्या दाराने आत गेला. दीपकने त्याला सगळ्यात शेवट तपासले आणि तो बाहेर पडताना दीपक दरवाज्यात उभा राहिला. तर एक पेशंट म्हणाला, हे काय डॉक्टर, आम्ही इथे थांबलो आहोत आणि तुम्ही यांना एकट्याला काय तपासता? त्यावर दीपक पटकन म्हणाला, त्याची पँट सोडायची होती, तुमच्यासमोर करू का? दवाखान्यात हास्यकल्लोळ पण माझ्या मित्राला इतकं लाजल्यासारखं झालं की सीतेसारखे धरणीमातेने त्याला उदरात घ्यावे. त्याने अक्षरशः तिथून धूम ठोकली. पुढचे बरेच दिवस तो दीपककडे जाणे टाळत होता.
  • एकदा मी आणि आणखीन दोन गृहस्थ आतमध्ये होतो. त्यातले एक बरेच म्हातारे होते. त्यांनी त्यांचे ब्लड प्रेशर चेक केले आणि नॉर्मल आहे असे म्हटल्यावर म्हणाले, डॉक्टर बघा, 86 वर्षांचा असून किती ठणठणीत आहे. मला सुपारीच्या खांडाचे सुद्धा व्यसन नाही. तो माणूस बाहेर पडला तर दीपक माझ्याकडे म्हणाला, च्यायला, ह्या जगण्यात काय अर्थ आहे? आयुष्यात कसली मजाच केली नाही. आणि तिथे असलेल्या दुसऱ्या माणसाकडे बघत म्हणाला, अरे आपल्याला 70 पेक्षा काही जास्त जगायचे नाही. मला त्या माणसाचा चेहरा थोडा पडलेला वाटला. दीपकने पुढचा प्रश्न विचारला, काय रे तुझं वय किती? तो माणूस म्हणाला 69. मला कुठे तोंड लपवू असे झाले पण दीपक बिनधास्त.
  • एक पेशंट पोटात दुखतंय अशी तक्रार घेऊन आला होता. बहुदा तो दीपकच्या ओळखीचा असावा. दीपकने बरोबर त्याला जिथे दुखत होते ती जागा न दाखवता बरोबर पकडली. त्याला म्हणाला, अरे जरा दारू कमी पी. मला त्याकाळी रेडियोवर प्रसारित होणारी जाहिरात आठवून हसू आवरेना.
  • मला काही वर्षांपूर्वी जरा झोपेचा प्रॉब्लेम झाला होता. बायको पण बरोबर होती. मला म्हणाला तुला काहीही झालेले नाही आणि सगळ्यांसमोरच म्हणाला, अरे एक दोन पेग मार, मस्त झोप लागेल. मी त्याला सांगितले की बरं झालं, बायकोच्या देखतच सांगितलंस ते. आता तिला तक्रार करायला काही वावच नाही.

त्याच्या निदानाचे आणि धोका न पत्करण्याची माझ्या बाबतीत घडलेली काही उदाहरणे सांगतो.

  • माझा धाकटा मुलगा पाच एक वर्षांचा असताना काहीतरी खाण्यामुळे प्रचंड पोट बिघडलं; दीपककडून औषध आणले तरी जुलाब थांबेना. रात्री 11.30 ला फोन केला तर म्हणाला कोणी पेशंट सिरीयस असल्यामुळे मी निघतो आहे तरी तू त्याला ताबडतोब माझ्या घराच्या खाली घेऊन ये. त्याने गाडीच्या डिक्कीवर झोपवून मुलाला इंजेक्शन दिले. मला म्हणाला अजून एकदा जरी जुलाब झाला तरी सरळ हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे, मला फोन करायचा नाही. पण बहुदा तशी वेळ येणार नाही. आणि खरंच तशी वेळ आली नाही.
  • 1999 साली माझ्या वडिलांना पोटात काहीतरी गाठी वाटत होत्या म्हणून मी दीपककडे त्यांना घेऊन गेलो. बाबांना म्हणाला की आपण डॉ केळकरांना एकदा दाखवू या आणि मी येईन तुमच्याबरोबर. संध्याकाळी मला फोन करून म्हणाला की बाबांची उद्याची अपॉइंटमेंट घेतली आहे पण मला कॅन्सरची दाट शक्यता वाटते आहे. वाटलं की दीपकचे निदान यावेळी तरी खोटे ठरावे पण नाही झाले तसे.

मी त्याच्या दवाखान्यात गेलो की माझा नंबर सगळ्यात शेवटचा कारण त्याला थोड्या गप्पा मारायच्या असतात. मग त्या पाच मिनिटात माझ्या अख्ख्या खानदानाची, मित्र परिवाराची चौकशी करून होते. आज माझी आई म्हणजे त्याची आई झाली आहे. अत्यंत प्रेमाने चौकशी. कधी तिला बघायला घरी आला तर तिच्याशी अगदी मनमोकळ्या 10-15 मिनिटे गप्पा मारेल ज्यायोगे तिला आपोआप बरं वाटायला लागतं. माझ्या आईनेच त्याचे धन्वंतरी असे नामनिधान केले आहे आणि ते अतिशय चपखल आहे.

आजच्या युगात फॅमिली डॉक्टर हा प्रकारच पूर्णपणे नामशेष झाला आहे. फॅमिली डॉक्टर कसा असावा? सर्व कुटुंबियांना जो आपला वाटेल, ज्याच्याबद्दल संपूर्ण विश्वास वाटेल तो म्हणजे फॅमिली डॉक्टर. आमचं नशीब थोर की आम्हाला दीपक सारखा डॉक्टर मिळाला जो आमच्या तब्येतीची संपूर्ण कुंडली जाणतो. डॉक्टर खूप असतात पण रात्री बेरात्री एका फोनवर धावून जाणारे दीपकसारखे फार कमी. मला असे अनेक किस्से माहित आहेत किंवा अनुभवले आहेत की दीपक अगदी कितीही वाजता पेशंटला बघायला त्याच्या घरी जातो. अशा वेळी GP चे महत्व किती असते ते लक्षात येते. आज सगळेच स्पेशालिस्ट, त्यांना ठराविक वेळेनंतर फोन करणे हे सुद्धा शक्य नसते.

माझी मुले आज अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया मधून त्याला फोन करतात. माझा पुतण्या राहतो दिल्लीला पण त्याचा विश्वास एकच; मला यादव डॉक्टरचेच औषध लागू पडते. तो फोन करतो आणि आम्ही मग त्याचे औषध कुरियरने पाठवतो.

दीपक अदितीला हाफ डॉक्टर म्हणतो कारण बऱ्याच वेळा ती त्याला विचारत असते की मला असं असं होतंय, घरात ही औषध आहेत, हे घेऊ ना? एकदा मी त्याला फोनवर म्हटलं माझी तब्येत जरा बरी नाही तर अदिती म्हणतेय ते औषध घेऊ का? मला म्हणाला, अरे डॉक्टर कोण आहे? तुला काय द्यायचं ते मला ठरवू दे. माझी बोलती बंद.

आज दीपकचा मुलगा, अमेय, ही यादव खानदानातील चौथी डॉक्टर झालेली पिढी, अगदी बापाला शोभेल असा दवाखाना सांभाळतो.

हल्ली खूप वेळा लक्षात येते की अनेक पेशंट कंपाऊंडरला विचारतात की आत मोठे डॉक्टर आहेत का छोटे? कारण त्यांना छोटेच हवे असतात. सध्याच्या कोरोनाच्या वातावरणात सुद्धा अमेयने दवाखाना बंद केलेला नाही. पण त्याने दीपकला मात्र येण्याची बंदी घातली आहे. त्याच्या पणजोबांपासून ह्या यादव खानदानाच्या चार पिढ्या डॉक्टरांची जी काय ती Hippocratic Oath म्हणतात ती अगदी इमानेइतबारे पाळून रुग्णसेवेचे व्रत पूर्ण करत आहेत. दीपकच्या याहून काय अधिक हवे? He must be a very happy father.

दीपकला ज्योतीच्या रूपाने एक अत्यंत अगत्यशील आणि सुगरण अशी साथ मिळाली आहे. त्यांच्याकडे जेवायला जायची कधी वेळ येते तेव्हा मेजवानीच असते. अमेयला देखील नीलम सारखी छान बायको मिळाली आहे.

उद्या 18 ऑक्टोबरला या आमच्या धन्वंतरीला 68 पूर्ण होत आहेत. दीपक, आमच्या सर्वांची सत्तरी होईपर्यंत तुला थांबायचे असल्याने तुला इतक्यात exit घ्यायची परवानगी नाही आणि त्यात तुला काहीही चॉईस नाही.

© यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com