आज अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचे भूमिपूजन संपन्न झाले. त्यावर गेले काही दिवस नुसता काथ्याकूट चालू आहे. गंमत म्हणजे त्याला विरोध करणारे मुसलमान अथवा ख्रिश्चन लोकं, निदान व्यक्त स्वरूपात तरी, कमी आहेत. जास्ती विरोध हा तथाकथित समाजवादी बुद्धिनिष्ठ मंडळींचाच दिसतो आहे. त्यातील काही प्रमुख विरोधाची उदाहरणे.

  • रामजन्मभूमी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीने जखम चिघळत ठेवण्यासाठी, जखमेचं भांडवल करण्यासाठी पेटवलेला मुद्दा आहे.
  • मला जर मंदिराच्या जागी दुसरं काही बांधलं जावे असे वाटले म्हणजे काही मला माझ्या धर्माचा अभिमान नाही असे होत नाही. मला हिंदू असण्यासाठी रामाला मानण्याची काय गरज? जर माझ्या दृष्टीने राम मंदिर हे महत्वाचे नसेल तर मला स्वाभिमानच नाही हे म्हणणे बरोबर आहे का?
  • काय नेमकं साजरं करतोय आपण इतकं हरखून जायला? श्री रामाचं मंदिर होतंय? मंदिराशिवाय आपण त्याला मानलं नसतं का? कुणी खरा श्री राम भक्त असेल तो अशा तकलादू मंदिर निर्माणाने खुश होणार नाही.. मंदिर निर्माणाने कोरोना जाणार आहे का? जेव्हा लॉकडाउन उठून सर्व सुरळीत होईल तो खरा सुदिन; तोवर शिलान्यास मंदिराचा की मस्जिदचा याने काही फरक पडत नाही.
  • खरं तर मदिर बांधणं ही काही देशापुढे एकच प्राधान्य क्रमाची गोष्ट नाही. या पेक्षा कितीतरी कामं पडून आहेत. कोरोना, विकास, रोजगार, शेतमालाला भाव हे जास्त महत्वाचे आणि सामान्यांच्या जीवनाशी निगडीत असलेले प्रश्न आहेत. ते आधी पहायला हवं. हृदयात भाव असेल तर चराचरांत देव आहे. त्यासाठी अयोध्या आणि मंदिरच कशाला हवं?

माझ्या मते प्रश्न फक्त राम भक्त असण्याचा नाहीये. आस्तिक – नास्तिक – किंवा धर्माचा पण नाही. तो आहे जुलूम आणि हिंसाचाराने हजारो वर्षांपासून आपल्या संस्कृतीवर अकारण केलेल्या अन्यायाचा. कोणतीही गोष्ट, अन्याय अथवा जोर-जबरदस्तीने हिरावून घेणे जगभरातल्या कोणत्याच धर्माला, संस्कृतीला अथवा माणूसकीला मान्य होणार नाही.

धर्मांध मुस्लिम आक्रमकांनी सोमनाथ मंदिर उद्ध्वस्त केले होते तसेच मीर बांकी या बाबराच्या सेनापतीने अयोध्येतील श्री राम मंदिर उध्वस्त केले आणि त्या जागी मशीद बांधली. हिंदू श्रद्धा पायदळी तुडवून त्याचा तेजोभंग असहिष्णू विध्वंसकांनी वारंवार केला आणि हिंदूंचे प्रमुख श्रद्धास्थान असलेले अयोध्या, काशी मथुरा आणि सोमनाथ ही खास करून पतन करण्यात आली.

सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार कै वल्लभभाई पटेलांच्या प्रयत्नांमुळे झाला आणि आज श्री राम मंदिराच्या पुनःनिर्माणाचा शुभारंभ होत आहे. “इ.स. 1528 मध्ये हिंदूंच्या माथी मारलेला कलंक 492 वर्षांनंतर पुसला जाणार आहे“. म्हणूनच आजचा दिवस ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा आहे !!! आणि तो मनापासून साजरा करावासा वाटतोय !!

मी एकदाही अयोध्येला गेलेलो नाही. मी नियमित देवळात जातो असंही नाही. मी गीता संपूर्ण वाचलीही नाही आहे. मी जगभरातील अनेक चर्च तसेच भारतातील अनेक दर्ग्यात जाऊन आलोय. रामजन्मभूमीचा मुद्दा बघत बघत आमची पिढी लहानाची मोठी झाली आहे. “हिंदुत्व” हा विषय भारतात कसा रुजत गेला हे समजून घ्यायचं असेल तर फक्त राम मंदिर विषय कसकसा वळणं घेत या अंतिम टप्प्यावर आला आहे इतकं बघितलं तरी भागतं.

माझ्या मते हिंदू मन मुळातच सर्वधर्मसमभावी असते. परंतु जसजशी सामाजिक जाणीव वाढू लागते तसे तथाकथित सेक्युलर विचारधारा किती बेगडी, दुटप्पी आहे हे दिसायला लागते. कळायला लागल्यापासून, सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव, भाईचारा, बंधुभाव, अल्पसंख्यांक आणि हे असंच फक्त कानावर पडत गेलं. परंतु मुस्लिमांच्या तुष्टीकरणाकरिता शाहबानो केसच्या निमित्ताने घटनेत बदल केलेले दिसत होते. “या देशातील साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे” अशी विधानं ऐकू येत होती. हिंदू सणांना टोकाचे पुरोगामी असणारे चेहरे ईदला टोप्या चढवून इफ्तार पार्ट्या झोडताना दिसत होते. एखाद्या हिंदू गुंडाने शाब्दिक धमक्या दिल्या तरी कित्येक दिवस चालणाऱ्या चर्चा आणि लिहिले जाणारे अग्रलेख वाचनात येत होते परंतु “विशिष्ट समूह” भावना दुखावल्यामुळे वाट्टेल तसा वागत जातो तेव्हा “पोलिसांनी अल्पसंख्यांचे मन जिंकले पाहिजे” असं बिनदिक्कत बोलले जात होते. हे सगळं जोपासणारे, टिकवणारे, वाढवणारे चेहरे स्पष्टपणे समोर येत होते.

रामाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं. अगदी राम मुळात होता का इथपासून ते इथेच जन्मला का आणि तत्सम अगणित प्रश्न. जिथे राम जन्म झाला ही करोडो हिंदूंची श्रद्धा आहे तरी देखील कित्येक दशके न्यायालयीन लढा दिला गेला. आणि न्यायालयात तिथे श्री रामाचे मंदिर होते हे पुरात्वखात्यातर्फे सर्व शहनिशा होऊन सिद्ध झाले आहे. आज संवैधानिक मार्गाद्वारे राम मंदिर निर्माण होत आहे. तरीसुद्धा पुरोगाम्यांना ते मंजूर नाही. “तारीख नहीं बताएंगे” म्हणत खिजवत राहिलेल्यांना आजची तारीख नकोशी झालीये. राम जन्मभूमीवरील मंदिर हे या सगळ्या दुटप्पी, स्युडो लोकांना दिलं गेलेलं उत्तर आहे.

७०% हुन अधिक लोकसंख्या असलेल्या धर्माचं एक मंदिर बांधून हवं आहे म्हणून न्यायालयीन लढाई लढली जाते अशी इथल्या मातीची लोकशाहीची बांधिलकी आहे. हिंदुत्ववादी संघटना गेली अनेक दशकं ज्या मुद्द्यावर सतत भांडत होत्या, त्याचा 9 नोव्हेंबरला “आपल्या बाजूने” निकाल लागला तरी उत्सव वगैरे काहीही घडले नाही उलट हा सर्व भारतीयांचा विजय आहे अशीच प्रतिक्रिया होती. तरी देखील हिंदुत्ववादी म्हणजे कट्टर, खुनशी, हिंसक, फॅसिस्ट. असो..

आता राम मंदिरामुळे भक्ती आणि श्रद्धेमधे काहीही फरक पडणार नाहीचेय. प्रश्न होता बळजबरीने हिरावून घेण्याचा, आपल्या भावनांचा अनादरच नाही तर त्या पायदळी तुडवण्याचा. आज खूप लोकांना आश्चर्य वाटतंय की अरे, एवढ्या करोडो लोकांना मंदिर हवे होते हे आपल्याला कळलेच नाही. त्यांना समजलेच नाही की हा हुंकार गेल्या अनेक पिढ्या धुमसत राहिलेल्या अन्यायाचा आणि रागाचा परिपाक आहे. तसे बघायला गेलं तर आपल्या पुरातन संस्कृतीची प्रतिकं असलेल्या कित्येक मंदिरे आणि स्मारकांवर वेळोवेळी हल्ले होऊन लूटमार झालेली आहे. त्या सगळ्याचा हिशेब करायला गेलो तर अवघडच आहे. परंतु आयुष्यात पहिल्यांदा एखादी गोष्ट नाकावर टिच्चून केली जातेय जी माझ्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय हिंदू माणसाला सुखावणारी आहे.

ज्या राष्ट्रातील जनसमुदाय आपल्या सांस्कृतिक इतिहासाचे स्मरण ठेवतो, तोच समाज आत्मसन्मान आणि आत्मविश्वास जागवू शकतो. कैलास पर्वतापासून ते हिंदी महासागरापर्यंत सर्वदूर शंखध्वनी पोचतो, कळतो आणि त्याचा अर्थही तोच असतो. शंखनाद हा आपल्या संस्कृतीत शुभसूचक आहे. देवळात म्हणून तर शंखनाद केला जातो. रणांगणावरती सुध्दा प्रथम शंखनादच करतात. आणि हो, तसेच शंखध्वनी हा आपल्या आगमनाची वर्दी देतो. इंग्लिशमध्ये म्हणतात तसं, we have arrived!

विटांवर लिहिलं गेलेलं श्रीरामांचं नाव एका ऐतिहासिक क्षणाची साक्ष होते आणि या क्षणाचे आपण साक्षीदार आहोत ही भावना मोठी विलक्षण आहे. गेली 400-500 वर्षे आजचा हा दिवस पाहण्यासाठी ज्यांनी ज्यांनी तन-मन-धनाने प्रयत्न केले, त्या सर्व महानुभावांना मनापासून अभिवादन.

🌺।। जय श्रीराम ।।🌺

यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

#Ram_Mandir #Mandir #Hindu #Babar