श्री शंकर, माता पार्वती, कुमार कार्तिकेय आणि गणपती ह्यांचा कौटुंबिक संवाद चालू होता. कार्तिकेयाला गणपतीची मस्करी करण्याची लहर आली आणि तो म्हणाला, बंधुराज, चला आता हळूहळू तयारीला लागा. महिन्याभरात पृथ्वीवरची तुमची वार्षिक भेट जवळ यायला लागली आहे. आधी पहिले कानाचे काहीतरी व्यायाम करा नाहीतर ठणाणा वाजणाऱ्या नगाऱ्याने कानाचे पडदे फाटतील. तुमचे कान जरी हत्तीचे असले तरी देखील आवाज इतका कर्कश्य असतो की ते कान देखील गळून पडतील. गणपतीने काही बोलण्याच्या आधीच कळलाव्या नारद मुनींचे आगमन झाले.

नारद: भगवान, घात झाला ! भारतवर्षातील महाराष्ट्र सरकारने यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात गणेश मूर्तीच्या उंचीवर निर्बंध आणले असून आता ती फक्त दोन ते चार फूटच उंचीची असू शकते. हा भक्तांवर किती मोठा अन्याय आहे याचा सरकार विचार करणार आहे का ? तसेच सार्वजनिक मंडळे येणाऱ्या पैशातून किती मोठी सामाजिक कार्ये करतात. आता जर उत्पन्नच नाही झाले तर समाजाची केवढी मोठी हानी होईल याचा कोणी विचार करणार आहे का ?

शंकर: हो हो नारद, जरा दमाने घे. मला एक सांग की अशी वेळ का आली ?

नारद: अहो, तो म्हणे काय कोरोना नामक एक विषाणू सध्या पृथ्वीतलावर धुमाकूळ घालतो आहे. काहीतरी दीड कोटी लोकांना म्हणे बाधा झालीये. पण आपल्या भारतात लोकसंख्येच्या तुलनेत फारच अत्यल्प आहे. बरं, गणेश जाणार मुख्यतः महाराष्ट्रात. त्यात परत हा विघ्नहर्ता, तो त्या विषाणूचा चुटकीसरशी नायनाट करेल हे त्या सरकारला कळत कसे नाही ? बघा त्या ओरिसामध्ये रथयात्रा होणार आहेच की नाही ? मग हा अन्याय गणपतीवरच का ?

पार्वती: नारद, मला सांगा हा उत्सव सुरु कधी झाला आणि कोणी केला आणि का केला ? उगाचच माझ्या लेकराचे दर वर्षी किती हाल करायचे म्हणते मी. हा उत्सवच बंद करून टाकला तर या माझ्या धाकट्याचे किती त्रास वाचतील, हो की नाही ?

नारद: माते, अशी कठोर नको होऊस. तसा हा उत्सव शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या काळापासून आहे पण तो नंतर विस्मरणात गेला. 1892 साली भाऊसाहेब लक्ष्मण जावळे (भाऊ रंगारी) यांनी त्याला प्रथम सार्वजनिक स्वरूप दिले. त्याकाळी असलेल्या ब्रिटिश सरकारनी जन उठाव होऊ नये म्हणून वीस लोकांपेक्षा जास्त लोकांसाठी कायमचीच जमावबंदी 1870 सालापासूनच लागू केली होती. परंतु त्यातून मुस्लिम समाजाला त्यांच्या शुक्रवारच्या नमाजाला सूट होती. ही गोष्ट लोकमान्य टिळकांनी खूप खटकत असे परंतु या भाऊ रंगारीमुळे त्यांना एक गोष्ट लक्षात आली की अशा हिंदूंच्या उत्सवाला देखील सरकार थांबवू शकणार नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या केसरीमधून या भाऊ रंगारीचे खूप कौतुक केले. तसेच गणपती ही जनसामान्यांची देवता असल्यामुळे त्याचा समाज प्रबोधनासाठी पण फायदा होऊ शकेल हे हेरून त्यांनी 1893 साली या सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ केली.

कार्तिकेय: छान आहे की हे सगळं, माझ्याच भावावर होणारा हा असा अन्याय मी नाही सहन करणार.

शंकर: अरे कार्तिकेया, त्या ब्रह्मदेवाने जेव्हा ही पृथ्वी निर्माण केली तेव्हा ती स्वर्गासारखीच सुंदर होती रे ! या मानवांनी तिचा नरक करून टाकला आहे. मजा, त्यांच्या भाषेतील एन्जॉयमेंट, याच्या नावाखाली झालं काय तर फक्त विध्वंस. मुर्तींची उंची २ ते ४ फूट असावी हा सरकारचा निर्णय आला आणि काही लोकांना शोक अनावर झाला, का ते ठाउक नाही. पण हा नारद सुद्धा त्यांची वकिली करत इथे धावत आलाच ना ? मला एक गोष्ट समजत नाही की जर देवत्व मूर्तीच्या आकाराप्रमाणे वाढणार असेल तर मग जेमतेम १ फूट उंची असणाऱ्या माझ्या गणेशाच्या सिद्धिविनायक रूप असलेल्या मंदिरात एवढी गर्दी का होते ? आणि जर कलाकाराला आपली कला सादर करण्याला वाव हवा असेल तर तो कलाकार त्याची कला ४ फुटात नाही का सादर करु शकत ? अरे उलट मला तर आनंद आहे की जे शंभर वर्षात सरकारला जमलं नाही ते या कोरोनाने मात्र एका वर्षात करुन दाखवलं. आणि एक लक्षात ठेव की अरे, हा कोरोना देखील त्या ब्रह्मदेवाचीच उत्पत्ती नाही का ? त्याला मारण्याचे पातक माझ्या मुलाच्या माथी कशाला ? अरे हा माणूस जितका भिकार आहे ना, तितका परमेश्वराने निर्माण केलेला कुठलाही इतर प्राणी नसेल. मेल्यावर स्वर्ग मिळेल का ह्या विचाराने तो स्वर्गासाख्या निसर्गाची जी नासधूस करतो आहे ना त्याला थोडं ताळ्यावर आणण्यासाठी ही परमेश्वरी योजना आहे. तेव्हा शांत हो !

नारद: अहो भगवान, त्या महाराष्ट्रीयन लोकांची श्रद्धा बघा. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या अतिशय सुबक 36 फुटी बनवितात. लोक श्रीगणेशाला नवसाला पावणारा मानतात. दहा दिवसाच्या उत्सवात अक्षरशः लाखो लोकं त्याचे दर्शन घेतात. ऊन पाऊस याची तमा न बाळगता काही सेकंदांच्या दर्शनासाठी सहा ते आठ तास रांगेत उभे राहतात. आता त्यांच्या भावना किती दुखावल्या जातील याचा कोणी विचारच करत नाही.

गणपती: आई, तू तर आदिमाया आणि मी तुझ्या मळापासून तयार झालो म्हणजे एक प्रकारे ही मातीच. मग ह्या प्लास्टर ऑफ पॅरिसची कल्पना आली कुठून ?

पार्वती: खरं आहे रे माझ्या सोन्या; पण त्या मानवांना कोण आणि कसे समजावणार ?

नारद: अरे गजानना, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती किती सुरेख आणि आखीव रेखीव असतात हे काय तुला माहित नाही का ?

पार्वती: नारद मुनी, पुरे झाली तुमची पोपटपंची. हिंदूंच्या भावना दुखावल्या जातात हे नितांत थोतांड आहे. किंबहुना हिंदू आणि हिंदू धर्माची जेवढी विटंबना खुद्द हिंदूंनी केली आहे ती इतर कुणी केली नसेल. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा एवढा आग्रह का ? त्या मूर्ती विरघळत नाहीत हे ठाऊक असून सुद्धा, लोकं निव्वळ त्या रेखीव दिसतात म्हणून आणतात. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी त्या न विरघळलेल्या मुर्ती तोडून फोडून पुन्हा समुद्रात फेकल्या जातात तेव्हा बऱ्या यांच्या भावना दुखावत नाहीत एकाही हिंदूच्या ? काही वर्षांनी ‘गणपती विसर्जन ‘असं न म्हणता, ‘गणपती हत्या दिन ‘असं म्हणायची वेळ आणली आहे या मानवाने.

कार्तिकेय: आई, काय हे ? हत्या काय म्हणतेस ?

पार्वती: हो हो, हत्याच. जसा त्या छत्रपती संभाजीचा देह औरंगजेबानं तुकडे तुकडे करून फेकून दिला होता, तेच ही माणसे करतायेत त्यांच्या ‘सो कॉल्ड’ देवाचं. अरे या माझ्या लेकराचे डोकं धडापासून वेगळं, हात तुटलेले, पाय तुटलेले, पोट फुटलेलं. म्हणजेच त्याची हत्याच म्हणायला हवी ना ? दहा दिवस त्याला देव म्हणून पूजतात आणि अकराव्या दिवशी त्याचे हात-पाय, डोकं, तोडून समुद्रात खोल नेऊन फेकायचं. नाही फुटलं तर हातात छिन्नी-हातोडा घेऊन मूर्ती फोडायची आणि मग आत नेऊन फेकायची. परंतु तरी देखील माझ्या गणेशाचे विसर्जन करताना मात्र “आमच्यावर कृपा कर, सुखात ठेव” अशी त्याची प्रार्थना करायची. त्यांची एखादी लाडकी व्यक्ती ‘गेल्यावर’ त्याचे हात -पाय तोडून त्याची चिता पेटवून अंत्यसंस्कार करतात का ? नाही ना ? मग ज्याला ‘देव’ म्हणून पूजतात त्याच्या बाबतीत असा अघोरी प्रकार करताना काहीच कसं वाटत नाही ? अरे यांना फक्त त्यांचा ‘Show’ पाहिजे. उत्सव संपल्यावर अगदी गणपती असला तरी पायदळी तुडवला गेला तरी चालेल अशा पद्धतीने वागणारे मानव तुला दिसत नाहीत का ?

नारद: माते, अहो या हिंदू धर्मियांचा उत्साह बघण्यासारखा असतो. त्या उत्साहाचा तरी विचार करा.

गणपती: मुनिवर्य क्षमा असावी, पण निदान माझ्यासमोर तरी त्या उत्साहाचे कौतुक करू नका. अहो, मंडपात माझी स्थापना करून काय दिवे लावतात ते बघायला याच एकदा. हिडीस गाणी लावून पावित्र्याची तर वाट लावतातच पण माझ्या कानठळ्या बसायची वेळ येते. मी म्हणून माझ्या कानाचे पडदे अजून शाबूत आहेत. रात्रभर मंडपात जाग हवी म्हणून माझ्या मागे बसून टोळक्यांनी पत्ते खेळणे आणि इतर काय काय घडतं कुणास ठाऊक. मी आपलं आपल्या पाठीमागे चाललंय म्हणून दुर्लक्ष करतो झालं. पण विसर्जनाच्या मिरवणुकीत माझ्या समोरच दारू पिऊन नाचताना यांना देव कसा नाही आठवत ? देवत्व राहिलं बाजूलाच; लोकं माझ्या मूर्तींचा आकार, माझ्या वेगवेगळ्या पोजेस ह्यातच अडकून बसले आहेत. अफजलखानाने मूर्ती फोडल्या म्हणून त्याला हे आपला शत्रू मानतात पण मग हे काय वेगळं करतायेत ? विसर्जनाची विटंबना बघून कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचं निदान माझ्या माहितीत तरी नाही. आणि हो, मला देव मानून देखील अशा यातना द्यायच्या आणि मग आपलं काही वाईट झालं की परत मलाच जाब विचारायला मोकळे. हा धार्मिकपणा नाही, दांभिकपणा आहे कारण हे सगळे ढोंगी आहेत.

आणि सण आणि उत्साह याबद्दल काय बोलावे ? माझे विसर्जन झाले की पाठोपाठ नवरात्र आणि देवी उत्सव. परत मोठ्यामोठ्या मुर्त्या आणि माझ्या उत्सवाप्रमाणे धांगडधिंगा. देवी विसर्जन झाले की साईबाबा येतीलच. मला तर असं लक्षात येतं की हे सगळे सण नसून देवाच्या नावाने चाललेला एक बाजार आहे.

कार्तिकेय: गणेशा, बरोबर आहे तुझं. तुझे हे विचार वाचून त्यांना फक्त राग येऊ शकतो. अजून काहीही होणार नाही. “वाईट वाटून आपण बदलावं” हे मात्र त्यांना कधीच वाटणार नाही. आजची ही परिस्थिती असेल तर अजून 5-10 वर्षांनी हा उत्सव कसा असेल ह्याची कल्पना देखील करवत नाही. किंबहुना हा उत्सव अस्तित्वात नसला तर अधिक आनंद होईल असं वाटतंय.

नारद: नारायण, नारायण ! देवा आता तुम्हीच काहीतरी बोला. मला तर काही कळेनासं झालं आहे.

शंकर: मला वाटतं हीच वेळ आहे. कुठलाही राजा असो वा महाराजा असो, नवसाला पावत असो किंवा नसो, ह्यापुढे तहहयात शाडूच्याच मूर्ती आणि ज्या देखील फक्त २ ते ४ फुटांपर्यंतच असाव्यात. कुठलंही मंडळ ह्याला अपवाद असता कामा नये; अगदी कुठलंही मंडळ. आज नाईलाजास्तव त्या लालबागचा राजा आणि इतर काही मंडळांना उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे हे लक्षात घ्यायला हवे. पुढच्या वर्षी सगळं सुरळीत झाले तर ते काय करतील याचा अंदाज करायला ज्योतिषशास्त्र माहित असण्याची गरज नाही. जर मानव याला ‘उत्सव’ म्हणत असतील, तर तो उत्सवासारखाच साजरा व्हायला हवा. गणपती हा देव आहे, खेळणं नाही की जे खेळून झालं की मोडून टाकलं. आणि हो, शाडूच्या मातीची मूर्ती असली तरी विसर्जन समुद्रात न करता जर स्थानिक पातळीवर तेथील एखाद्या कृत्रिम (मानवनिर्मित) कुंडातच केले तर विसर्जनाची बीभत्स दृश्ये पुन्हा दिसणार नाहीत. मानवाने विचार करायची वेळ आली आहे कारण ही परिस्थिती त्यालाच बदलायला हवी अन्यथा आज कोरोना आहे; कदाचित उद्या त्याचा कोणीतरी मोठा भाऊबंध येईल. तेव्हा हे मानव कुठे लपतील ?

नारद: गणराया, तू तर बुद्धीची देवता आहेस मग तू का नाही या मानवात बदल घडवून आणत ?

गणपती: मुनिवर्य, अहो, गेले कित्येक वर्षे हे मी बोंबलून सांगण्याचा प्रयत्न करतोय पण त्या नगाऱ्याच्या गोंगाटात कोणाची ऐकण्याचीच इच्छा नाही. या वर्षी कोरोनामार्फत संदेश पाठवला आहे. समजलं तर नशीब नाहीतर….. आणि हो, तशीही चीनमध्ये ब्युबॉनिक प्लेगचा उद्रेक होण्याची लक्षणे तर आहेत. बघू, त्यामुळे तरी विचारात बदल होतो की नाही ते.

नारद: नारायण ! नारायण !

यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

#गणपती #गणेशोत्सव #विसर्जन #Ganesh #Festival #Ganeshotsav

(Thanks for the inputs from Swaroop Kale)