आज अत्यंत दुर्दैवाने आणि खेदाने असे म्हणायची वेळ येते की सरकारी काम म्हणजे अत्यंत टुकार आणि निकृष्ट दर्जा. अगदी पूर्ण भारताचे बाजूला ठेवा, आपण फक्त मुंबईचा विचार करूया. दर वर्षी पावसाळ्यात मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमय होतात; खरे तर असे म्हणायला हवे की बऱ्याच वेळेला खड्ड्यातून रस्ता शोधावा लागतो. गेले १५-२० वर्षे तरी दर वर्षी तीच तक्रार. एक तर आपल्याला चांगले रस्ते बनवताच येत नाहीत किंवा चांगले रस्ते बनवायचेच नाहीत असा दृढ निश्चय सरकारी अधिकारी आणि कंत्राटदार यांनी केलेला दिसतो. कारण चांगली कामे केली तर मग दुरुस्तीच्या नावाखाली ज्यादा खर्च कसा करता येईल? रस्ताच असा बनवायचा की तो काही महिन्यातच नवीन आहे की जुना हे कळू नये अशी त्यांची योजना असते परंतु आपणच मूर्ख की ते आपल्याला कळत नाही.

तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर वर्षोनुवर्षे हेच चालू आहे तर मग मी आज नवीन काय लिहितो आहे?

काही महिन्यांपूर्वी महानगरपालिकेने असे जाहीर केले की सिध्दीविनायक मंदिर ते माहिमचा मखदूमबाबा दर्गा हे पर्यटन क्षेत्र अथवा Cultural Path म्हणून विकसित करण्यात येईल. येथे राहणारी आमच्यासारखी स्थानिक मंडळी खूष झाली. या विकासाचा भाग म्हणून सर्व फुटपाथ कसे चांगले समतल बनविण्यात येतील आणि ज्या मध्ये अंध व्यक्तींच्या सोयीसाठी Tactile Path असेल, तसेच शिवाजी पार्क मध्ये ठिकठिकाणी बसण्यासाठी बाकडी, बस स्थानकामागे फ्लॉवर बेड्स आणखीन काय काय! खूप गाजावाज़ा केला. सगळ्या पेपरात छापून आणले.

सुरुवातीला घाईघाईने सगळे paver ब्लॉक्स उखडून काढले; मग ते चांगले आहेत का वाईट याचा विचार नाही आणि सगळ्या फूथपाथचा सत्यानाश झाला. आधीचे बरे असे म्हणायची वेळ आली. शिवाजी पार्कच्या कट्ट्याला china mosaic च्या टाईल्स चिकटवण्यात आल्या. ते काम इतकं खराब की पुढचे काम करायला गेले की आधी केलेले उखडायले जात होते. तेवढ्यात लॉकडाऊन चालू झाला आणि साहजिकच काम ठप्प.

गेल्या महिन्याभरात अचानक महापालिकेला जाग आली आणि सगळे फुटपाथ पूर्ण करण्याचा धडाका लावला. काम पूर्ण होऊन जेमतेम दोन आठवडे झाले असतील पण सर्वत्र ह्या नवीन केलेल्या concrete वर भेगा पडल्या आहेत. सततचा पाऊस सुरु झाला की त्या भेगा अजून रुंदावतील आणि अधिक खोल होतील.

अंधासाठी म्हणून Tactile Path केला परंतु अत्यंत सुमार दर्जाचा Die वापरण्यात आला असावा त्यामुळे Detectable Impressions नीट उमटलेच नाहीत. तसेच हा tactile path बनवताना विचारशक्तीचा पूर्ण अभाव असल्याचे दिसून येते. काही अंतर गेल्यावर एक आडवा खड्डा की ज्याचे काय करायचे माहित नसावे त्यामुळे नुसतीच माती भरून सोडून देण्यात आले. हे अंधांना कसे कळावे?

अनेक ठिकाणी हा path जवळजवळ काटकोनात वळवण्यात आला आहे. ही आमची अंध लोकांबाबतची जागरूकता. 👆

अंधांसाठी केलेला path पण काही दिवसातच पूर्ण गुळगुळीत. 👆

ह्या path वर देखील जागोजागी भेगा पडल्या आहेत. त्याचप्रमाणे कित्येक ठिकाणी, त्यावरील ठसे झिजून गेल्याने ते भाग गुळगुळीत झाले आहेत. पावसाळ्यात तिकडे शेवाळं साचून ते निसरडे होतील तेव्हा धडधाकट माणसे सुद्धा तोंडघशी पडतील. वॉर्ड ऑफिसला तक्रार नोंदवली की “आम्ही त्यात लक्ष घालू आणि योग्य ती कारवाई करण्यात येईल” असे छापील असल्यासारखे उत्तर मिळते. आता दुरुस्तीच्या नावाखाली नवीन कंत्राटदार आणि नवीन बजेट. मग हा नवीन माणूस आधी केलेलं काम useless म्हणून सगळं मोडीत काढणार आणि पुन्हा परत नवीन सुरुवात. पुनश्च हरी ओम!

आता तुलनेसाठी परदेशातील एका अशा path चा हा फोटो बघा.

परंतु निकृष्ट दर्जाची कामे केल्याबद्दल संबंधित अधिकारी अथवा कंत्राटदार यांना जबाबदार धरल्याचे आजतागायत कधी ऐकिवात नाही. त्यामुळे कोणालाच त्याचे काहीच वाटेनासे झाले आहे. पालिका बोट दाखवणार महाराष्ट्र सरकारकडे आणि ते केंद्र सरकार आणि सार्वजनिक बांधकाम खाते यांना बोल लावणार. आणि त्यात भरीस भर म्हणून, काहीही बदल होणार नाही या भावनेने नागरिक सुद्धा चिडीचूप. अंधेर नगरी आणि चौपट राजा अशी आपली मुंबईकरांची अवस्था आहे.

महापालिका हा शब्द मला मोठा समर्पक वाटतो. महानगरांचे “पालन” करणारी संस्था म्हणजे महापालिका असा अर्थ मला तरी ध्वनित होतो. पालन करणाऱ्या महापालिकांचे पोषण नागरीक कररूपाने करतात. त्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी नगरसेवक निवडून दिले जातात. अशी सर्व यंत्रणा आहे. वरवर पाहता आदर्श वाटावी अशी ही योजना प्रत्यक्षात दिवसेंदिवस ढासळते आहे. त्यामुळे ही व्यवस्था निकाली काढण्याची गरज आहे.

न्युयाॅर्क, लंडन, टोकियो इ. सारख्या शहरांना सिटी अथाॅरिटी असते. त्यांना पुरेसे अधिकार व जबाबदारी असते. शहरातील सर्व यंत्रणा त्यांच्याच अधिपत्याखाली येतात. शहरांमधे population density किती असावी याचेही नियोजन व नियंत्रण करण्याचे अधिकार त्यांना असतात. तेच त्या शहरांचे पालक असतात. पण आपण यामधून काही शिकणार का? हा कळीचा मुद्दा आहे.

इंग्रजांनी मुंबई शहराच्या व्यवस्था लावल्या. त्यानंतरच्या सत्तर वर्षात आपण कोणते नियोजन केले? महापालिकेने किती नवी सार्वजनिक इस्पितळे बांधली? किती सार्वजनिक शौचालये बांधली ? किती उद्याने राखली? ह्या प्रश्नांची उत्तरे शोधायला गेलो तर शरमेने मान खाली जाते. महापौर हे पद शोभेचे असण्याऐवजी कामाचे असावे असे का वाटत नाही?

राॅबर्ट मोझेस हा न्यूयॉर्क शहराचा सर्वात जास्त काळ व सगळ्यात प्रभावी महापौर होता. साधारण शंभर वर्षांपूर्वी त्याने अधिकारपद घेतले तेव्हा न्युयाॅर्क शहराची अवस्था आजच्या मुंबईसारखी होती. त्याने कारभाराची सूत्रे खाली ठेवली तेव्हा न्यूयाॅर्कचा संपूर्ण कायापालट झाला होता. He was principally responsible for construction of major public projects in the city of New York including roadways, bridges, tunnels etc. He also changed shorelines & transformed neighborhoods forever. न्यूयाॅर्क शहराचा मास्टर बिल्डर अशी उपाधी त्याला दिली गेली. तो अर्थातच टास्क मास्टर होता व कठोरही होता.

बरं चला, अमेरिका आणि युरोप सोडून द्या. आज अगदी थायलंड, मलेशिया, फिलिपाइन्स या देशांमधील शहरात गेलो तरी तिथले infrastructure आपल्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले आहे. त्यांना जमते मग आपल्याला का जमू नये? का आपल्याकडे ती इच्छाशक्तीच उरली नाहीये?

कणखर कारभार शहराला अथवा राज्याला पुढे नेतो, हळूवारपणा नव्हे हे केव्हा समजणार? मुंबईकरता असाच एक राॅबर्ट मोझेस शोधण्याची गरज आहे. असे अधिकार असलेला व ते राबवणारा महापौर नेमला तरच या शहराचे काही भले होईल अन्यथा…….

दुर्दैवाने असे नुसते म्हटले की मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा हा डाव आहे अशा भावनिक हाकाटीला सुरुवात होते. परंतु भावनिक आवाहने करून उघडे पडलेले बूड कसे झाकले जाणार आणि हा असा खेळ किती दिवस खेळणार?

यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

#Mumbai #Infrastructure #New_York #Robert_Moses

(Thanks to Shriram Dandekar & Seema Khot for their inputs)