मी आधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे सध्या इंटरनेट हा सगळ्यात जिवलग सखा झाला आहे. तो नसता तर हा लॉक डाऊन इतक्या सहजी पेलता आला नसता. त्यामुळे प्रथमतः या मित्राचे अनंत आभार. परवा याच्या बरोबर फिरताना एक पत्र समोर आले. सुरुवातीला जरा थबकलो; वाटलं हे कसले पत्र? पण उत्सुकता चाळवली गेल्याने पूर्ण वाचलं आणि स्तब्ध झालो. वाटलं, जर Covid-19 ने मानवाला जर पत्र लिहिले तर ते असेच काहीतरी असेल. मी जे खाली लिहिलंय ते ना तर त्या पत्राचे भाषांतर आहे, ना की त्याचा स्वैर अनुवाद. पत्र वाचल्यानंतर मला जे वाटले त्याचे हे मनोगत आहे.

आमच्या प्रिय पृथ्वीवासियांनो,

अरे बाबांनो, जरा थांबा, थोडी उसंत घ्या. आम्ही विनंत्या करून थकलो म्हणून ही विनंती नाही; आज्ञा आहे. अन्यथा आम्ही तुमची विमाने, ट्रेन्स, गाड्या एका क्षणार्धात ठप्प करू. तुमचे आवाजापेक्षा जोरात धावणारे चक्र मधेच बंद करू. तुमच्या शाळा, मॉल्स, मिटींग्स निमिषार्धात स्तब्ध करू. तुमचे बिथरलेले आणि अस्ताव्यस्त धावणारे मन आणि त्यातून निर्माण होणारे भ्रम आणि जबाबदाऱ्या, ह्यामुळे तुम्हाला आपली एकदिलाने धडधणारी स्पंदने आणि एकत्रित होणारे श्वासोच्छवास ऐकूच येऊनासे झाले आहेत.

तुम्ही आज विसरले असाल तरी ह्यात नवीन काहीच नाही कारण हे असे नेहमीचेच झाले आहे. खरं तर तुम्हाला एक ब्रेकिंग न्यूज द्यायची आहे पण ह्या मन विचलित करणार्‍या कर्णकर्कश गोंगाटाचे हे कधीही न संपणारे प्रसारण जोपर्यंत खंडित होत नाही तोपर्यंत ती तुम्हाला ऐकूच येणार नाही.

आपले काही ठीक चाललेलं नाही. आपल्या पैकी कोणाचंही नाही; आपण सगळेच ग्रासले आहोत. गेल्या वर्षी जाळणाऱ्या वणव्यांनी या पृथ्वीची फुफ्फुसे निकामी करायचा विचार केला तरी देखील तुम्ही थांबतच नाही. दर वर्षी येणारी वादळे, नवनवीन रोगांच्या साथी तुम्हाला काही सांगतच नाही की तुम्ही ऐकायचेच नाही असे ठरवलेय? आयुष्यात ऐशोआरामात राहण्यासाठी लागणार्‍या सोयी सुविधांचा डोलारा टिकवून ठेवण्यासाठी दिवस रात्र तुम्ही मेहनत करीत असताना ह्याच्याकडे लक्ष जाणे जरा कठिणच आहे. अरे पण लेकांनो, या निसर्गाला स्वतःच्या हव्यासापोटी ओरबाडताना त्याचे कधीतरी हुंदके ऐकायचा निदान विचार तरी करा.

लक्षात घ्या की तुमच्या गरजा आणि वासनांच्या भाराखाली पाया ढासळत चालला आहे. त्यामुळे आता आम्ही तुम्हाला एकच मदत करू शकतो की अशी अग्नी वादळे तुमच्या शरीरापर्यंत आणून आमच्या संसर्गाने तुमच्या फुफ्फुसांची जळजळ घडवून आणू तेव्हाच तुमचे डोळे उघडतील.

तेव्हा तुम्हाला जाणवेल की आपण आजारी आहोत.

तुम्हाला किती आणि काही जरी वाटले तरीही आम्ही काही तुमचे शत्रू नाही; आम्ही तुमचे सहयोगी आहोत. आम्ही निसर्गाचे दूत आहोत आणि त्या निसर्गाचा ढासळलेला तोल सावरण्यासाठी आम्ही आलो आहोत. आम्ही तुम्हाला सांगतोय: थांबा, अजून पुढे जाऊ नका, ऐका; तुमच्या वैयक्तिक चिंतांच्या पलीकडे जाऊन सगळ्यांच्या चिंतांचा विचार करा. तुम्हाला खरे ज्ञान प्राप्त झाले नाही हे मान्य करा, विनम्र बना, मेंदूने विचार करणे सोडा आणि तुमच्या अंत:करणात डोकावून अंतर्मुख व्हा.

विमानांच्या घिरट्या कमी झालेले आकाश पहा, आणि अगदी लक्षपूर्वक त्याच्याकडे पहा, कसे दिसते आहे ते? धूसर, धुरकट,पावसाळी की निरभ्र? तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर ते आकाश किती निरोगी असायला हवे याचा विचार करा. त्याचप्रमाणे एखाद्या झाडाकडे बघा, नीट पहा आणि त्याची स्थिती समजून घ्या. तुमचे आरोग्य चांगले राहण्यासाठी जरूरी असलेल्या शुद्ध हवेसाठी त्याच्या आरोग्याचे कसे आणि किती योगदान असते हे जाणून घ्यायचा निदान प्रयत्न तर करा. एखाद्या नदीवर जा आणि तिच्या स्थितीचे अवलोकन करा, कशी आहे ती? नितळ, स्वच्छ, गढूळ, प्रदूषित? तुम्ही निरोगी राहायला हवे म्हणून तिने किती स्व्च्छ असण्याची गरज आहे? तुम्हाला सुदृढ ठेवणार्‍या आकाशाचे आरोग्य चांगले असण्यासाठी झाडाचे आरोग्य चांगले असायला हवे आणि यासाठी नदीच्या आरोग्याचा हातभार लागतो हे निसर्गचक्राचे गूढ समजून घ्या.

विचार करा की एक माणूस काय घरी बसला आणि कोण कोण किती सहज आणि बिनदिक्कतपणे बाहेर आले? मुंबईतील बाबुलनाथ येथे मोर नाचतील असे कधी स्वप्नात तरी वाटले होते का तुम्हाला? अदृश्यरूपाने जाऊन बोरिवली नॅशनल पार्क मध्ये एक फेरफटका मारा. आपण मुंबईत आहोत हे विसरून जाल. चंडीगड शहरात हरणे रस्त्यावर आलीयत, अनेक ठिकाणी समुद्राचे पाणी पुन्हा निळेशार झाले आहे तर जालंदर शहरातून चक्क हिमालयाची धौलाधार रेंज स्पष्ट दिसायला लागलीय. रस्त्यावर गाड्या नाहीत, सतत धूर ओकणारे कारखाने बंद आहेत त्यामुळे हवेतले प्रदूषण गायब झाले आहे. अनेक प्रकारचे कर्कश्श आवाज आणि माणसे दिसत नसल्याने प्राणी आणि पक्षी आनंदी झालेत.

परंतु आज मात्र सगळे मानव भयभीत झालेत. परंतु हे भयाचे भूत तुमच्या मानगुटीवर बसू देऊ नका आणि त्याला तुमचा ताबा घेऊ देऊ नका. त्याऐवजी, आम्हाला तुमच्याशी बोलू द्या आणि शांतपणे आमच्याकडून शहाणपणाच्या चार गोष्टी ऐका. आपल्या वैयक्तिक गैरसोयी आणि आजारांच्या पलीकडे काय चालू आहे? हे कोरोना नक्की काय प्रकरण आहे आणि कशा कशाला धोका आहे? हे लक्ष देऊन ऐका.

त्यामुळे विरोध करत असाल तर जरा थांबा आणि लक्ष द्या. आपण कसला विरोध करतो आहोत हे ही पहा. “का” असे विचारा पण स्वत:ला. थांबा. खरचं थांबा. निश्चल रहा; नका पुढे जाऊ. ऐका. आजार आणि उपचार याबद्दल आमचं काय सांगणं आहे ते ऐका. सगळे स्वस्थ व निरोगी रहावेत म्हणून कशाची गरज आहे हे आम्हाला विचारा. आम्ही मदत करायला कधीही तयार होतो आणि आहोत परंतु प्रश्न आहे की तुम्ही ऐकायला तयार आहात का? .

आज तुम्ही उद्याच्या अनामिक भीतीने थरथरत केविलवाण्या अवस्थेत स्वतःच्या घरट्यात कोंडून बसले आहात. प्रत्येकाला एकच भीती ग्रासून राहिली आहे आणि ती म्हणजे आपण उद्या असू की नसू. परंतु आमचं ऐकलेत तर हे ही दिवस जातील, नक्कीच जातील. एकच गोष्ट लक्षात ठेवा की आकाशाला जरूर गवसणी घाला पण या आपल्या धरणीमातेचा थोडासा तरी विचार करा. तिला ओरबाडणे जरा कमी करा रे! तेवढे जरी केलेत तरी आमचे या पृथ्वीतलावर येण्याचे चीज झाले असे आम्ही समजू.

तुमचा आगंतुक पाहुणा

कोरोना

yeshwant.marathe@gmail.com