लिखाण ही जरी लेखकाची वैयक्तिक गोष्ट असली तरी त्याचा मुख्य उद्देश वाचकाने ते वाचावे हाच असतो; म्हणजेच आपले खाजगी शब्द सार्वजनिक व्हावे ही खरी इच्छा.

बऱ्याच लोकांचे म्हणणे असते लेखकाने स्वतःसाठी लिहावे, लोकांना आवडण्याचा काय संबंध? परंतु ते काही मला पटत नाही. जर माझा उद्देश लोकांनी वाचावे असा असेल तर लिखाण आवडले तरच लोकं वाचतील; नाही का? माझ्या मते लेखन हे एक संवाद साधण्याचे साधन आहे ज्यायोगे आपल्या कल्पना, भावना दुसऱ्याच्या मनापर्यंत पोहोचवता येतात.

हल्ली टेक्नॉलॉजीमुळे वाटेल ती माहिती मिळत असते. गुगल वापरून आणि भाषांतर करून रोज जरी एक कुठचातरी लेख लिहायचे ठरवले तरी सहज शक्य होईल. परंतु माझा पहिल्यापासून कटाक्ष होता की प्रत्येक लेख हा मी स्वतः लिहिलेला असायला हवा. कॉपी पेस्ट करण्यात काय गमंत? त्याचा तर व्हॉटसॲपवर सतत भडीमार चालूच असतो. मात्र त्यातून लोकांशी संवाद साधता येत नाही, आणि मला तर तोच साधायचा होता. म्हणून मी दोन वर्षांपूर्वीच असे ठरवले होते की गुगलचा वापर फक्त माहिती मिळवण्यासाठी करायचा पण आपल्याला जे काही म्हणायचे आहे ते स्वतःच्या शब्दात मांडायचे. सुदैवाने ते आजपर्यंत साध्य झाले.

माझा अजूनही विश्वास बसत नाही की माझा ब्लॉग लिहायला सुरुवात करून आज दोन वर्षे झाली. दर आठवड्याला किमान एक असे या कालावधीत मी जवळपास १३० लेख लिहिले. या सर्व लेखांचे मिळून मी म्हणे दीड लाख शब्द लिहिले; अविश्वसनीय वाटतं, नाही का? तुम्ही सर्वांनी खूप प्रोत्साहन दिलेत आणि मी लिहीत राहिलो. पहिल्या वर्षाच्या अखेरीस असलेले १४००० व्ह्यूज आज एका वर्षात ३२००० ने वाढून ४६००० पार झाले आहेत. तुम्हां सर्वांचे आभार मानावे तेवढे थोडेच.

लोकांना माझे लिखाण का आवडले असावे याचा विचार करताना असे जाणवले की घडणाऱ्या घटनांवर त्यांच्या मनातील भावनांना मी काही प्रमाणात वाचा फोडली. असे खूप वेळा घडले की वाचकांनी स्वतःहून मला एखाद्या विशिष्ट विषयावर लिहावे अशी प्रेमाची विनंती केली उदा. मुंबई मेट्रो, हैद्राबाद बलात्कार, काश्मीरीयत, बेरोजगारी, भारतीय दांभिकता वगैरे.

परंतु मी कोणी मला चांगलं म्हणतंय अथवा माझ्या पोस्टला लाईक करतंय म्हणून काहीतरी खरडायचं हे मला कधीच पटणार नाही. कारण मग संपलंच सगळं! मी जे लिहितोय ते जरूर माझ्या आनंदासाठी परंतु त्या लिखाणामुळे जर कोणाच्या चेहऱ्यावर थोडसं जरी हसु आलं तरच तो माझा आनंद द्विगुणित होईल; बस्स एवढं साधं आहे सगळं!! मला एक भान मात्र कायम राखायचे आहे की काहीतरी मोठे व्याख्यान झाडणारा किंवा प्रवचन देणारा मी कोणी तत्ववेत्ता नव्हे. मला वाचकांशी थेट संवाद साधायचा आहे; तो ही त्यांच्याच भाषेत. आज सर्वच जण रोजच्या मेटाकुटीने त्रस्त आणि तणावपूर्ण वातावरणात जगत असतात. माझे लिखाण वाचून त्यांना थोडा विरंगुळा मिळावा, निखळ करमणूक व्हावी ही खरी मनापासूनची इच्छा. म्हणूनच मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे राजकीय विषयावर लिखाण मला कंटाळवाणे आणि नको वाटते. एक तर अशा लिखाणाची आज सोशल मीडियावर रेलचेल, छे छे, अतिरेक झाला आहे. डावे विरुद्ध उजवे आणि मोदी भक्त विरुद्ध मोदी द्वेष्टे यांच्या पोस्टचा इतका सुळसुळाट आहे की त्याचा तिटकारा येऊ लागला आहे.

म्हणूनच भविष्यात काय लिहायचे याचा सखोल विचार करावा लागेल. मनात विषय खूप घोळता आहेत पण त्याची संयुक्तिक मांडणी कशी करायची हे नीट लक्षात येत नाही. पुढे लिहीत राहण्यासाठी खूप अभ्यास करण्याची गरज आहे. आणि अभ्यासासाठी वाचनाला पर्यायच नाही. गेल्या काही वर्षात या सोशल मीडिया मुळे वाचनाचा पार बोऱ्या वाजलाय आणि ती गाडी पुन्हा रुळावर खेचण्याची आत्यंतिक गरज आहे. त्यामुळे या अभ्यासासाठी ब्लॉग लिखाणापासून थोडी विश्रांती, थोडा विराम घ्यावा लागणार आहे (Sabbatical). आता हा विराम किती काळासाठी हे अजून तरी ठरवले नाही पण साधारण दीड ते दोन महिने नक्कीच घ्यावा लागेल असे वाटतंय. या विराम काळात सगळ्याच सोशल मीडिया वरून थोडा बाजूला होणार आहे. एक प्रकारे detox म्हणूया ना!

तुम्ही देखील थोडा सुटकेचा निःश्वास टाकाल की आता निदान काही आठवडे तरी मी तुम्हाला त्रास देणार नाही.

इस ब्रेक के बाद फिर से मिलेंगे, हम लोग.

यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com