आम्ही गेली ७-८ वर्षे माझ्या नीरजा या सामाजिक संस्थेच्या कामांमुळे पालघर जिल्ह्यात कार्यरत आहे. सुरुवातीच्या ४-५ वर्षात इतक्या अनंत अडचणी आल्या की असे वाटले की आपण घेतलेला हा निर्णय बरोबर की चूक?

कारण कुठच्याही गावात जायचे म्हणजे तुम्ही कोण? इथेच का आलात? येण्यामागचा उद्देश काय? ही प्रश्नावली थांबतच नाही. परंतु लोकांना आपल्याबद्दल का आणि कशामुळे विश्वास वाटावा? लोकांचा विश्वास बसण्यासाठी काहीतरी भरीव काम व्हायला हवे आणि हे भरीव काम होण्यासाठी लोकांचा विश्वास असायला हवा – म्हणजे हे आधी कोंबडं की आधी अंडं – अशा सारखे होऊन जाते. तेव्हा असे लक्षात आले की जोपर्यंत एखाद्या पंचक्रोशीत आपला स्वतःचा असा जर स्थानिक प्रभाव नसेल तर काम करणे जवळजवळ अशक्य आहे. 

याच उद्देशाने आम्ही ऑगस्ट २०१५ मध्ये भोपोली येथील डॉ. एम एल ढवळे फौंडेशन यांच्याशी संपर्क केला. त्यांच्याच माध्यमातून असे सांगण्यात आले की कुंर्झे गावातील पंचायत समिती सदस्य श्री. विजय वेखंडे हे बरेच सामाजिक कार्य करत असतात तेव्हा तुम्ही त्यांना भेटा. त्यांच्याशी फोनवर संपर्क केला असता असे कळले की ते त्या गावात दारूमुक्ती केंद्र चालवितात आणि दर रविवारी त्यांचे हे कार्य चालते. आम्ही रविवार २० सप्टेंबर २०१५ रोजी कुंर्झे गाव शोधत निघालो. वाटेत कोणालाही विचारले तरी वेखंडे सर (ते शाळेत शिक्षक आहेत) यांचे नाव माहित नाही असे काही झाले नाही. आम्ही त्यांच्या दारूमुक्ती केंद्रावर पोचलो आणि पार चक्रावून गेलो. एका मोठ्या हॉलमध्ये किमान ३००-४०० लोक जमले होते आणि सर सर्वांशी संवाद साधत होते. त्या दिवशी फार वेळ नसल्यामुळे सरांशी प्राथमिक चर्चा करून आम्ही तिथून निघालो.

काही दिवसांनंतर त्यांना आम्ही परत भेटलो आणि आमच्या संस्थेचे उद्दिष्ट वगैरे गोष्टींबद्दल चर्चा केली. त्यावर त्यांचे भाष्य एवढेच होते की रेनवॉटर हार्वेस्टिंग वगैरे सगळं ठीक आहे परंतु जिथे पिण्यायोग्य पाणीच नाही तिथे ते उपलब्ध करून देणे ही प्राथमिक गरज आहे आणि त्यासाठी बोअरवेल ह्या पर्यायाचा विचार आम्ही करावा. सुरुवातीला आम्हांला ते फारसं पटत नव्हते परंतु जेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर सुमारे १०-१५ पाड्यांवर गेलो. तेथील भयावह परिस्थिती बघून काय बोलावे तेच कळेना. पाड्यातील आदिवासी एखाद्या खड्ड्यातील पाणी पितात आणि तेच पाणी गावातील गुरे आणि इतर प्राणी देखील पितात हे बघून बोबडीच वळली. त्यामुळे अशा पाड्यांमध्ये दर वर्षी नवीन रोगराई. हे सगळे बघून मात्र त्यांचे म्हणणे आम्हांला थोडेफार पटले. जानेवारी २०१६ मध्ये आम्ही पहिल्या चार बोअरवेल केल्या आणि सुदैवाने त्या सर्वांना व्यवस्थित पाणी लागले. 

पुढील ३ वर्षात आम्ही सुमारे ५०-६० बोअरवेल या पंचक्रोशीत केल्या आणि आश्चर्य म्हणजे त्या पैकी एकाही बोअरवेलला पाणी लागले नाही असे कधी झालेच नाही. तसेच या कालावधीत कुठच्याही बोअरवेलचे पाणी आटले नाही. ही गोष्ट जेव्हा आम्ही आमचे तांत्रिक सल्लागार डॉ. अजित गोखले यांच्याशी बोललो तर ते म्हणाले की ते या क्षेत्रात गेली १६-१८ वर्षे कार्यरत आहेत आणि असे एकही उदाहरण त्यांच्या पाहण्यात तर सोडा, ऐकण्यात पण नाही. या सर्व बोअरवेलची जागा कुठे असावी हे अचूक शोधण्याचे काम वेखंडे सरांनीच केले होते म्हणून जेव्हा मी त्यांना धन्यवाद द्यायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचे एकच म्हणणे होते की आपण सर्वांनीच कसल्याही प्रकारची इच्छा न ठेवता निस्वार्थी बुद्धीने काम केल्यामुळे तो जगनियंता म्हणा, देव म्हणा, आपल्या पाठीशी उभा राहिला आहे. त्यांचे हे विचार ऐकून अवाकच झालो आणि आपोआप हात जोडले गेले. 

आता थोडीशी विजय वेखंडे यांची वैयक्तिक ओळख करून घेऊया

हा माणूस जरी शिक्षक असला आणि जरी आज दारूमुक्ती केंद्र चालवत असला तरी १९९३ पर्यंत दारूच्या व्यसनात पार बुडालेला होता. कित्येक वेळा रस्त्यावर दारू पिऊन पडलेल्या अवस्थेतून त्यांना घरी न्यायची वेळ यायची. तब्येत बिघडू लागली तसे घरच्या लोकांनी दारू सोडविण्याचे खूप प्रयत्न केले परंतु सगळे निष्फळ ठरले. आता या माणसाचा याच्यातच अंत होणार अशी घरच्यांची पण खात्री पटली. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. ४ जून १९९३ रोजी ते गुजरात मधील गणपत बाबांच्या संपर्कात आले आणि सुदैवाने त्यांची दारू सुटली. तसा ४ जून हा त्यांचा जन्मदिवस देखील आहे त्यामुळे ते गेली २६ वर्षे या तारखेला आपला वाढदिवस आणि पुनर्जन्म म्हणून साजरा करतात. गेल्या वर्षी त्यांनी खूप आग्रह केल्यामुळे या दिवशी त्यांच्या केंद्रावर गेलो. जवळपास ७००-८०० लोकांनी संपूर्ण परिसर व्यापला होता.

त्यांचा जिल्ह्यातील जनसंपर्क तर वाखाणण्याजोगा आहे. पंचायत समिती सदस्य असल्यामुळे ते लोक आले तर आश्चर्य वाटणार नाही पण बीडीओ, पालघर डीएसपी पासून अनेक मान्यवर त्यांना शुभेच्छा द्यायला आले होते. 

एकदा त्यांच्या बोलण्यात आले की जवळजवळ ९००० लोकांची त्यांनी दारू सोडवली आहे तेव्हा त्यांना अचंबित होऊन विचारले हे सर्व तुम्ही कसे करता? त्यांचे म्हणणे होते की मी स्वतः एकेकाळी दारुडा असणे माझ्या पथ्यावर पडले आहे; ते माझे सगळ्यात मोठे पात्रता प्रमाणपत्र आहे. कारण त्याचमुळे मी आलेल्या लोकांना सांगू शकतो की तुमची दारू जगातील कुठलाही डॉक्टर सोडवू शकत नाही कारण त्याने कधी दारू प्यायलेलीच नाही. मी स्वतः दारूचे उच्चांक मोडले आहेत त्यामुळे तुम्हाला नक्की काय वाटते, तुमची मानसिकता काय आहे हे माझ्याशिवाय दुसरे कोणी ओळखूच शकत नाही.

त्यांच्या दारूमुक्ती केंद्राचा रविवारचा कार्यक्रम ऐकणे हा एकाच वेळी थरारक आणि हृदयद्रावक असतो आणि त्याला सरांच्या नर्म विनोदाची फोडणी असते. तिथे आलेल्या पुरुष आणि महिला यांना केलेले समुपदेशन आपल्या शहरी लोकांना जरा भडक आणि बटबटीत वाटू शकते परंतु आलेल्या लोकांच्या मनाला हात घालण्याकरिता ते तसे असण्याचीच गरज आहे हे लक्षात येते. दारू सोडलेल्या पुरुषांचे आणि त्यांच्या बायकांचे अनुभव ऐकणे हा मात्र अंगावर काटा उभा करणारा प्रसंग असतो. ज्या कुठच्याही माणसाला थोड्याफार भावना असतील त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आज वेखंडे सरांनी उध्वस्त होणारी इतकी कुटुंबे सावरली आहेत की त्या लोकांच्या बदललेल्या जीवनाचे ते शिल्पकार आहे. साहजिकच या लोकांच्या नजरेतून वेखंडे सर हे देवपुरुष, नाही खुद्द देवच, आहेत. त्या लोकांची कृतज्ञता बघितली की सर किती मोठे कार्य करत आहेत याचा काहीसा अंदाज येतो. बरं, ही संपूर्ण फुकट केलेली समाजसेवा आहे आणि तरी सुद्धा या माणसात गर्वाचा लवलेश नाही. सगळे वेखंडे कुटुंब (त्यांची पत्नी, मुलगा समीर आणि सून) अत्यंत अगत्यशील आहेत. सरांच्या कार्यामुळे अफाट येणेजाणे असले तरी हसतमुखाने सर्वांचे आदरातिथ्य केले जाते. वेखंडे सर जेव्हा पंचक्रोशीतील कोणाच्याही कुठल्याही अडीअडचणींना न कुरकुरता उभे राहतात तेव्हा त्यांच्या या प्रचंड उत्साहाला आणि उर्जेला सलाम केल्याशिवाय राहवत नाही. 

आम्ही गेले ४ वर्षे त्यांच्याबरोबर संलग्न आहोत. कधीही एक पैशाची सुद्धा अपेक्षा न ठेवलेला हा माणूस खरा समाजाशिल्पी आहे. आमचे नशीब आहे की आमची ह्या माणसाची ओळख झाली आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या बरोबरीने काम करून पालघर जिल्ह्यात आता खरंच काहीतरी भरीव काम करता येईल अशी आशा निर्माण झाली आहे. 

त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. 

यशवंत मराठे
सुधीर दांडेकर
 

yeshwant.marathe@gmail.com

#Social_Change #दारूमुक्ती #समाजशिल्पी