आपण भारतीयांना आपल्या भूतकाळाबद्दल बोलण्याची अति खाज. आमचा भारत कसा महान होता, कसा आमच्याकडे सोन्याचा धूर निघत होता वगैरे वगैरे. अरे, पण लोक हो, ह्या गोष्टी सुमारे १५०० ते २००० वर्षांपूर्वीच्या आहेत. त्याच्यानंतर आपण काय केले आणि काय करतोय याचे मूल्यमापन कधी करणार?
जवळजवळ ७५० वर्षे आपला देश परकीय अंमलाखाली होता याची किती लोकांना खंत आहे? स्वातंत्र्यानंतर सुद्धा गेल्या ७२ वर्षात आपण असे काय दिवे लावलेत? माणूस गतकाळातल्या फुशारक्या मारतो कारण त्याचा वर्तमान लाजिरवाणा आणि भिकारडा असतो म्हणून. सरकारने नुसत्या विकासाच्या योजना आखून काय होणार? जोपर्यंत देशातील नागरिकांचा ढासळणारा दर्जा सुधारत नाही तोपर्यंत सगळ्या योजनांचा बोजवाराच उडणार. सातत्याने ढासळत जाणारा नागरिकांचा दर्जा हा राष्ट्रीय काळजीचा विषय असायला हवा. आपल्याच नागरिकांना जाब विचारायण्यासाठी असा प्रश्न विचारायला हवा की मागच्या ७२ वर्षांत तुम्ही अजूनही टुकार नागरिकच का आहात?
बोगीतील संडासातल्या टमरेलला साखळी बांधण्याची आयडिया ज्या कुठल्या कल्पक अधिकाऱ्याला सुचली असेल, त्याला शोधून काढून खास पारितोषिक द्यायला हवे कारण त्याचे भारतीय नागरिकांचे आकलन हे श्रेष्ठ दर्जाचे होते. तीच गोष्ट बँकेमध्ये पेन बांधून ठेवण्याची.
‘तेजस’ किंवा तत्सम आधुनिक रेल्वे गाड्यांमध्ये सुंदर बाकडी, एलईडी, छान वातानुकूलित व्यवस्था आणि असे बरेच काही असावे, ही कल्पना ज्याने मांडली त्याला निलंबनाचीच कठोर शिक्षा व्हायला हवी कारण त्याला भारतीय नागरिकांचे आकलन करताच आले नाही. ज्यांची लायकी हातगाडी किंवा बैलगाडीत बसण्याचीच आहे त्यांना त्याने रुबाबात न्यायचे स्वप्न पाहण्याचा प्रमाद केला.
बाळासाहेब ठाकरे एक किस्सा त्यांच्या शैलीत नेहमी सांगायचे. ‘लोक इथल्या हॉटेलमधले चमचे चोरुन नेतात. अगदी रोज नेतात. अरे, चोरी करायची ठरवलेच आहेस तर निदान मोठा दरोडा तरी टाक. चमचे काय चोरतोस?’
एका श्रेष्ठ भारतीय नागरिकाने, एका प्राणी संग्रहालयात, पिंजऱ्यातील माकड जाळी जवळ आल्यावर त्याच्या अंगाला खाजखुजली लावली होती आणि माकड खाजवून खाजवून वेडेपिसे झाल्याचा व्हिडीओ फेसबुकवर टाकला होता.
आज आम्हां भारतीयांची काय ओळख आहे?
• रात्री दोन वाजता कर्कश्य संगीत गाडीत वाजवत गल्ल्यांतून फिरणारे,
• गाडीचा दरवाजा उघडून ओकल्यासारखे तंबाखू थुंकणारे,
• ऐतिहासिक इमारतींवर स्वत:चे आणि स्वतःच्या मत्रिणीचे नाव कोरणारे,
• रस्त्यावरची बाकडी, रोड डिव्हायडर, फरशा चोरुन नेऊन विकणारे,
• एसटी किंवा रेल्वेचे सीट कव्हर सहज विरंगुळा म्हणून फाडणारे,
• जागोजागी पचापचा थुंकणारे,
• रस्त्यात कुठेही वाहने लावून दुसऱ्यांची अडचण करणारे,
• विनातिकिट प्रवास करून वर दादागिरी करणारे,
• कर चुकवणारे आणि लाच देणारे,
• दुसऱ्याच्या जमिनीवर खोटे नाव चढवून चाळीस/ पन्नास वर्ष सहजपणे खटले लढवणारे,
• सर्रासपणे वीजचोरी करून किंवा वीजबील न भरता वीजवितरण कंपनीला खड्ड्यात घालणारे,
• कायदारक्षणाची ड्युटी करणाऱ्या पोलिसाला मारहाण करणारे,
• गल्लीचा, गावाचा, वाडीचा उत्सव आहे म्हणून देवाच्या नावावर जबरदस्तीने खंडणी गोळा करणारे,
• रहदारीचे नियम बिनदिक्कत तोडून अभिमानाने सांगणारे,
• शून्य ट्रॅफिक सेन्स असणारे, (गाडी हायवेवर कशी चालवू नये हे प्रात्यक्षिक बघायला एकदा मुंबई पुणे एक्सप्रेस वे चा अनुभव घ्या)
यादी अजून खूप मोठी होईल,
हीच आपली ओळख झाली आहे. या ओळखीबद्दल कोण बोलणार?
सरकार बदलून खूप प्रयोग करुन झाले. त्याने काही फरक पडत नाही. आता जनताच बदलायला पाहिजे. कारण सरकार काय, मतदानाने कधीही बदलता येईल. जे कधीच बदलत नाहीत आणि दिवसेंदिवस अधिकच भिकार दर्जाचे बनत चाललेत, त्या नागरिकांचे काय करायचे ?
पण हेच सर्व महाभाग जेव्हा परदेशी जातात तेव्हा मात्र सगळे नियम पाळतात कारण तिथल्या कायद्यांची आणि दंडाची भीती, आणि म्हणूनच आपण भारतीय परदेशी गेलो की सुतासारखे सरळ वागतो.
गमंत म्हणून कधीतरी मुद्दामून लक्ष ठेवा हा आपला नागरिक परदेशातून परत आला की एयरपोर्ट पासूनच घाण करायला सुरुवात करतो. आज मुंबई तर घाणीचे माहेरघर झाले आहे पण त्याची लाज कोणालाच नाही.
परवाच फोर्टमध्ये असताना एके ठिकाणी काहीतरी थंड प्यावे म्हणून थांबलो तेव्हा तिथे ४–५ तरुण (तिशीतील) उभे होते. एकाने पेप्सी पिऊन झाल्यावर तो कॅन जमिनीवर फेकला आणि वर म्हणतो काय, अरे, त्या मोदीला बोलावं, स्वच्छ भारत स्वच्छ भारत म्हणून बोंबलत फिरत असतो. ही कसली घाणेरडी मानसिकता? शिवाजी पार्कला कट्ट्यावर केक ठेऊन वाढदिवस साजरा करायचा आणि कचरा तिथेच टाकायचा हे तर ठरलेलेच. कुणालाच त्याचे काही सोयरसुतक नाही.
जी मानसिकता नागरिकांची तीच सर्व सरकारी खात्यांची. भारत संचार निगम, वीजवितरण मंडळ, पब्लिक सेक्टर बँका, महानगरपालिका, आरोग्य विभाग, पोलीस असे कोणीही घ्या, ग्राहक सेवा कशाशी खातात याची कोणाला जाणीवच नसते.
इंग्लंडचे एकेकाळचे पंतप्रधान बेन्जामिन डीझरेली यांनी १५० वर्षांपूर्वी म्हणालेले वाक्य आपल्या देशाला चपखल बसते – “When men are pure, laws are useless! When men are corrupt, laws are broken !!”
जनता जनार्दन सुधारेल अशी अपेक्षा करणे पण गुन्हा ठरेल या देशात. ज्यांना या सर्व गोष्टींचा त्रास होतो त्यांना तो भगवंत पण सांगेल की तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी.. !!
पण मग असा प्रश्न मनात येतो की हे असं का? तेव्हा असं लक्षात येत की आपल्या नागरिकांमध्ये एक प्रकारचे वैफल्य आणि राग ठासून भरला आहे. त्याला स्वतःलाही माहित नसते की तो का रागावला आहे ते पण तो रागावलेला असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वांची अपेक्षा म्हणजे सगळ्या गोष्टी सरकारने कराव्या कारण माझी सुद्धा काही जबाबदारी आहे असे कोणाला वाटत देखील नाही. मग लगेच पुढचा प्रश्न उभा रहातो की लोकांची अशी मानसिकता असण्याचे कारण काय?
माझ्या मते याला मुख्यत्वे करून आपली सामाजिक आणि राजकीय यंत्रणा कारणीभूत आहे. आज आपण प्रत्येक जण बघतो की काही वर्षांपूर्वी गल्लीच्या नाक्यावर उभा राहणारा गुंड कालांतराने कुठल्या तरी राजकीय पक्षातर्फे निवडणुकीला उभा राहतो आणि मग धाक असेल, पैशाचे बळ असेल त्या जीवावर तो नगरसेवक म्हणून निवडून येतो. पुढील काही वर्षातच तो करोडो रुपयांची संपत्ती कमावतो (जी अवैध आहे हे शेंबडे पोर पण सांगू शकते) आणि मग तो आमदार होतो. मग तर काय पैशाचा पाऊसच पडतो. कालांतराने तो मंत्री होऊन मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने बघू लागतो. ह्या सर्व प्रवासात त्याने अजून किती गुन्हे केलेले असतात याची मोजदाद त्याला देखील नसते. या सर्व कुकर्मांबद्दल ना त्याच्यावर कधी खटला भरण्यात येतो, आणि आला तरी वर्षोनुवर्षे तो खटला सर्वात छोट्या कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत चालूच रहातो. कुठल्याही राजकारणी माणसाला कधी कडक शिक्षा झालीय असे सर्वसामान्यांना दिसतच नाही. समजा चुकूनमाकून एखाद्या राजकारणी नेत्यावर काही भ्रष्टाचार अथवा दुसरी कुठली कारवाई व्हायची वेळ आलीच तर तो पक्ष बदल करून सत्ताधाऱ्यांच्या गटात सामील होतो आणि मग सगळ्या चौकश्या बाराच्या भावात जातात आणि तो ताठ मानेने परत जनतेसमोर येतो. माझ्या मते लोक आता या नौटंकीला कंटाळले आहेत पण सांगणार कोणाला आणि ऐकणार कोण? त्यामुळे परत निराशा आणि वैफल्य.
आपल्याकडे न्याय मिळवण्याची प्रक्रिया इतकी लंबीचौडी आहे की माणूस कोर्टाची पायरी चढायलाच घाबरतो. या देशात न्यायव्यवस्थेचा अभावच आहे की काय असे शंकास्पद वातावरण निर्माण झाले आहे. आणि दुसरीकडे असे दिसून येते की ह्या राजकारण्यांची मग्रुरी अशी असते की मी काहीही केले तरी पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर या कायद्याला नाचायला लावीन. सामान्य माणसाला हेही दिसत असतं की गुन्हेगार म्हणून शाबीत झालेल्या याकूब मेमनची फाशी स्थगित व्हावी याची सुनावणी सुप्रीम कोर्टात अपरात्री २.३० वाजता होते. आपल्या सारख्या सर्वसामान्यांकडे हे बळ नसते त्यामुळे त्यांची फक्त मानसिक घुसमट होत रहाते आणि मग त्याचे पर्यवसान रागात होत असते. ह्या अशा सुप्त रागाचे प्रतिबिंब आपल्याला झुंडशाहीत दिसते.
हाच आपल्या देशात आणि पाश्चिमात्य प्रगत देशातील फरक आहे. तिथे राजकारणी असो वा सामान्य जनता असो, कायद्याची सर्वांना भीती असते.
या सर्व अशा व्यवस्थेमध्ये प्रसार माध्यमे, टीव्ही आणि प्रिंट मीडिया ह्यांची भूमिका फार महत्वाची असते. पण राजकीय प्रभाव आणि माध्यमे चालू राहण्यासाठी टीआरपी मिळवण्याच्या नादाने सगळा सावळा गोंधळ झाला आहे. त्यामुळे मग कुठल्या तरी टुकार बातम्या दिवसभर रेटायच्या, गुन्हेगारीचे उद्दात्तीकरण करायचे (उदा. संजय दत्त, सलमान खान). संजय दत्त जेल मध्ये काय करतो, त्याला पॅरोल मिळाला की नाही याचे गुऱ्हाळ चालूच. हगायला कधी गेला आणि किती वेळा मुतला हे सांगत नाहीत हे नशीब आपले. बरं जेल मधून बाहेर आले की अशा लोकांच्या आणि राजकारण्यांच्या भव्य मिरवणुकी; जसा काय तो अटकेपारच झेंडा लावून आलाय. कालांतराने त्या संजय दत्तच्या आयुष्यावर सिनेमा निघतो आणि करोडो रुपये कमावतो.
त्यामुळे सामान्य जनतेला कळेनासे होते की हे गुन्हेगार आहेत की नाही? आणि म्हणूनच अशी भावना तयार होते की गुन्हे करणे हाच मोठेपणा आहे आणि पैशाच्या जोरावर मी सगळ्यातून सहीसलामत सुटू शकतो.
तसेच अत्यंत व्यथित करणारी गोष्ट म्हणजे जेंव्हा झुंडशाहीचे बळी झाल्याचे कळते तेंव्हा लोकं काय विचार करतात? तो आपल्या पक्षाचा आहे का? कुठल्या धर्माचा आहे? कुठल्या प्रदेशातील आहे? दुर्दैवाने मीडिया सुद्धा पक्षपाती रिपोर्टींग करताना दिसतो. आपण भारतीय म्हणून विचार करायला कधी शिकणार? आपल्यात माणुसकी काही शिल्लक आहे की नाही?
ही मानसिकता कशी, कधी आणि कोण बदलणार? आत्ताच्या घडीला तरी ते अशक्य वाटतंय.
एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवी की आपण जगातील दुसऱ्या कुठल्याही देशात स्थायिक झालो तरी आपल्याकडे सेकंड क्लास किंवा थर्ड क्लास सिटीझन (नागरिक) म्हणूनच बघण्यात येणार. ज्या आई वडिलांच्या पोटी आपण जन्म घेतला त्यांचे आपण पांग फेडण्याबद्दल मोठ्या मोठ्या गप्पा करतो मग ज्या मातीत आपला जन्म झाला त्या भारतमातेचे ऋण आपण कसे फेडतो आहोत? हे असे बेशिस्त वागून?
विचार करकरून डोक्याचा भुगा होतो पण उत्तर मात्र मिळत नाही. मग जो आपल्याला मानसिक त्रास होतो त्याचं काय करायचं? त्यामुळे मी मग ठरवून टाकले की आपण स्वतःपुरता विचार करावा आणि ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी तरी मी निदान करणार नाही असे वागावे. उगाच जगाला बदलू वगैरे स्वप्नरंजन न करता असा विचार करावा की आपल्याकडे बघून जरी एक माणूस बदलला तरी आपले जीवन सार्थक झाले. आणि काही अंशी तरी या मातेचे ऋण मी फेडले.
यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com
#Discipline #Indiscipline #Swachcha_Bharat #बेशिस्त #स्वच्छ_भारत
अपरिपक्व लोकशाही हेच कदाचित मूळ कारण असू शकेल.
LikeLike
Perfectly written…..couldn’t disagree with any statement….I am most surprised and saddened with people’s skepticism of Modi’s swatcha Bharat initiative….one can criticise him for anything but at least support him on this
Sometimes even some of aggressive and manipulative people who are proud of their aggression and manipulative abilities ridicule others for being disciplined in India …
And sadly I have seen them getting away with indiscipline easily and proudly
LikeLike
मला देखील अगदी असंच वाटतं. आपण जग बदलू तर शकणार नाही पण विद्यार्थी, आपल्या घरातील नोकरवर्ग ह्यांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवू शकलो तरी खूप होइल.
I see students these days are really different and they do care for the image of our country. ICT students cleaned the elephanta caves recently and collected 4000 kg of trash. I also know of Ruia, Khalsa, Poddar students regularly clean the stations, paint it with Graffiti… the culture will percolate I am sure. Let us do our own small bit…
LikeLike
खरी गोष्ट आहे. पण बदल होतो आहे. तो हळू हळू होतो आहे हे खरं, पण बदल घडतो आहे. आणखी काही दशकांनी तो ठळकपणे दिसायला लागेल. आज अनेक लोक वरील लेखाप्रमाणे विचार करतात याचाच अर्थ बदलाला सुरुवात झाली आहे.
LikeLike
entirely agree. Indians as a race are indisciplined. It will take another 2 to 3 generations to improve.
LikeLike
आपल्याला येणारा राग जो सात्विक वैगरे असतो, तो योग्य मार्गाने किंवा वैचारिक जबाबदारीने कसा निवळू शकतो हेच कळत नसेल तर जी अवस्था होते त्याच अवस्थेत आपल्या देशाचे बहुसंख्य नागरिक गेली किमान १०० वर्षे आहेत , असे मला वाटते.
कारणे शोधतांना ठळक पणे दिसतात ती अशी- १ प्रथम उत्तरेकडून आणि नंतर पश्चिमेकडून भारतात झालेली घुसखोरी ही या मानसिक भीतीची सुरवात असावी कारण त्याकाळी भारतात असलेली नैसर्गिक सुबत्ता डोळ्यासमोरुन लुबाडून नेणार्यांचा सामना सामान्य सुखवस्तु भारतीय नागरिक करू शकला नाही. कारण तसे करण्याची गरजच् भासली नसावी!
२. स्वसंरक्षणा साठी ताकद आणि अेकजूट असावी लागते हि जाणीव ज्या ज्या द्रष्ट्या लोकांनी करण्याचा प्रयत्न केला त्यांना परकीय सत्ताधिशांनी गुन्हेगार ठरवून सामांन्यापासून दूर ठेवण्याची कीमया केली. ३. अशा परिस्थितीत , अज्ञान व त्यामुळे प्राप्त वैचारिक दुर्लभता ह्या दोन्ही मधे भर म्हणून कि काय, भाषिक वैवेध्यांची अडचण असणार्या सामांन्य भारतीयाला शहाणे बनणे जमले नसावे किंवा ती ऊणीवच् जाणवली नसावी. ४. १९व्या शतकांच्या सुरवाती पासून काही दूरदर्शी लोकांच्या प्रयत्नांमुळे नगरिक जाग्रुती दिसू लागली पण भारतीयांच्या केवळ दु्र्दैवानेच् सत्तालोलूप लोक प्रतीनिघीच्या कपटी राजकीय धोरणांमुळे पून्हा भारतीय जनतेची जाणीवपूर्वक दिशाभूल झाली आणि वरवरच्या गोड वागण्या दिसण्याला लोक आलबेल सरकार समजू लागले. ५. ह्या अल्प संतुष्ट अशा अज्ञानी जनतेच्या नशिबी आलेल्या वैफल्याचा बीमोड करावयास समाजीक व राजकीय नसलेल्या संघटीत सेवाभावी संस्थांचे कार्य सुरू झाले व त्यामुळे देश प्रेम व आत्मसन्मान ह्या साठी योग्य ती शीस्त , ताकद , स्वसंरक्षणार्थ केवळ काठीचा आधारही पुरतो ह्यची उघडपणे जाणीव अशा वैचारिक बैठकीचा श्रीगणेशा झाला खरा पण… प्रचंड अज्ञानी जनतेला फक्त योग्य असा काळच् वाचवु शकतो हेच आपल्या समोर सत्य आहे! नवि पीढी घडते आहे हे स्वगतार्ह आहेच पण स्वदेशी भावनांची त्याला जोड हवी हेही तीतकेच खरे. कालाय् तस्मयी नम:!!!
LikeLike
Extremely well written.
LikeLike
Very well written. Things are changing slowly. Due to globalisation, the younger generation is more aware about environmental issues
LikeLike
खुप छान लेखन केले आहे एकदम खरं
LikeLike
I am totally agree to all the points in this article.
Everyone should be responsible and treat all public places as our own…
LikeLike