सध्या आरे कॉलनी येथील झाडे तोडण्यावरून रणधुमाळी चालू आहे. काही महिन्यांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा मी ही गोष्ट ऐकली तेव्हा महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय बरोबर नाही असेच मला वाटले. पण गेले काही दिवस जे काही मी ऐकतोय आणि वाचतोय त्यावरून असं वाटलं की नक्की काय आणि कुठे चुकतंय तेच लक्षात येत नव्हते. मला असंही वाटलं की सरकार असा संवेदनशील निर्णय तडकाफडकी आणि एकतर्फी कसा काय घेईल? पण मग खरं काय? तेव्हा ठरवलं की याचा जरा अभ्यास करावा आणि या क्षेत्रातील तज्ञांशी बोलावे. अखेरीस असे लक्षात आले की फारच एककल्ली बाजू मांडली जात आहे. 

सुरुवातीला आपण आरे कॉलनीचा इतिहास बघूया. 

आरे कॉलनी, खरं तर आरे मिल्क कॉलनी, ही १९४९ साली स्थापन करण्यात आली आणि तेथील डेअरीचे उदघाटन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते १९५१ साली झाले. १२००० हेक्टर नॅशनल पार्क (आता संजय गांधी नॅशनल पार्क) मधील १२८७ हेक्टर (साधारण ११%) एवढी जागा आरे मिल्क कॉलनीला देण्यात आली. त्यावेळी हे करण्यामागचा उद्देश्य असा होता की उपनगरात जागोजागी पसरलेले गोठे एका जागी एकत्रित होतील. त्यावेळी देखील गोठेवाले सगळे भय्येच होते. सरकारने त्यांना अद्ययावत गोठे बांधून दिले. साधारण ५०० गुरे राहतील असे ३० गोठे बांधण्यात आले. तुम्ही स्वतःच्या मुख्यत्वे म्हशी आणि गाई तिथे ठेवायच्या. त्यांच्या चाऱ्याची सोय पण सरकारने करून दिली. खास आफ्रिकेतून नेपियर नावाचे गवत (biological name – Pennisetum Purpureum) आणून ते लावले की जे खास गाई म्हशींसाठी उपयुक्त ठरेल. आणि नंतर जे दूध काढले जाईल ते आरे डेअरीच विकत घेईल; म्हणजे विकीची हमी. ह्या मिल्क कॉलनीचे मुख्य उद्देश होते की ) शहराच्या हद्दीतून गुरे एकत्रित होतील ) मुंबईकरांना रास्त भावात चांगले दूध पुरवठा करता येईल आणि ) शास्त्रीय पद्धतीने या गुरांची निगा राखता येईल. या गोठ्यांबरोबर त्याच्या बाजूला वेगळ्या इमारती बांधण्यात आल्या जिथे गवताच्या गोडाऊनची व्यवस्था, गवत कापण्याची व्यवस्था, लोकांची राहण्याची सोय आणि होणाऱ्या वासरांची सोय या सगळ्या गोष्टी त्यात अंतर्भूत होत्या. 

कालांतराने गुजरा आणि महाराष्ट्रातील इतर भाग येथे आणखीन अद्ययावत डेअऱ्या उभ्या राहिल्या आणि आरे डेअरीची पीछेहाट झाली आणि गवत खाणारी गुरे कमी झाली. महत्वाची गोष्ट म्हणजे हे नेपियर गवत खूप फोफाट्याने वाढते. त्यामुळे कालांतराने त्या जागेला एक प्रकारचे जंगलाचे स्वरूप आले. 

आता जरा मुख्य विषयाकडे वळूया. 

आपल्या सगळ्यांना माहित आहे की शहराच्या जवळपास जिथे जिथे आज काँक्रीट जंगल दिसत आहे तिथे पूर्वी खरोखरचे जंगल होते. वादग्रस्त ठरलेली आरे कॉलनी ज्या गोरेगाव पूर्वेला आहे त्याच गोरेगावात पूर्वेला स्टेशनपासून हायवेपर्यंत घनदाट जंगल होते. आज तिथे अनेक वसाहती, इंडस्ट्रीयल इस्टेट्स उभ्या आहेत त्या सगळ्या झाडे तोडूनच बांधल्या गेल्या आहेत. सर्व शहरीकरण असेच झाले आहे. असेच होत असते. आणि असेच होत राहणार. अगदी ५००० वर्षांपूर्वी सुद्धा पांडवांनी इंद्रप्रस्थ वसवले ते संपूर्ण खांडववन जाळून आणि ते सुद्धा खुद्द श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून. असो. 

आरे कॉलनीचा पूर्णपणे एरिया आहे ३१६६ एकर. त्यापैकी फक्त ६२ एकर जमीन सरकारने कारशेड साठी दिली आहे. म्हणजे जेमतेम %. 

हा नकाशा बघा म्हणजे लक्षात येईल की ही सेव्ह आरे चळवळ नक्की काय आहे. मेट्रो कार शेड साठी जी हिरवळ व्यापली जाणार आहे तिचा एरिया किती छोटा आहे हे कळेल. आरे परिसरात रॉयल पाम्स, रेनिसन्स सारख्या पंचतारांकित वास्तू आहेत, फिल्म सिटी उभी आहे ज्यांचा एरिया याच्यापेक्षा मोठा आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या वास्तू उभ्या राहताना झाडे तोडली गेली नाहीत असा जर कोणाचा दावा असेल तर तो हास्यास्पद आहे. मग त्यावेळी ह्या अशा चळवळी आणि उहापोह झाला होता का? याचा विचार करा. 

आता मेट्रो कार शेड येत आहे. पण त्या भागात बांधकामे नवीन नाहीत. पर्यावरणाचे रक्षण करणे हा महत्त्वाचा मुद्दा असला तरीही तो विकासाच्या आड येत असेल तर मध्यममार्ग शोधून काढला पाहिजे. तो मुद्दा भावनिक करून चालणार नाही.

श्रद्धा कपूर ही अभिनेत्री आरे कॉलनी या मुंबईतील राखीव अभयारण्य़ात तोडल्या जायच्या वृक्षराजीच्या विरोधात झालेल्या निदर्शनांना अगत्याने उपस्थित होती. तिथल्या स्वयंसेवकांच्या सोबतीने घोषणाही देत होती आणि फलक घेऊन उभी होती. तिच्यामध्ये किती प्रामाणिकपणा आहे? तिला पर्यावरणाची किती आस्था आहे? जे फलक हातात घेऊन ती प्रदर्शन करत होती, त्याची तिला कितपत जाण आहे? किंबहूना तिच्या अवतीभवती घोषणा देणार्‍यांना तरी पर्यावरण हा आपुलकीचा विषय आहे काय, असा प्रश्न पडावा अशीच परिस्थिती दिसत होती. जर पर्यावरणाचे खरे प्रेम असते, तर तीच श्रद्धा कपूर त्याच्या काहीच दिवस आधी स्वतःच्या चित्रपटाची टिमकी वाजवायला कपील शर्माच्या कार्यक्रमात गेलीच नसती. कारण काही वर्षापुर्वी कपील शर्माने त्याच्या घराचा अनधिकृत विस्तार करण्यासाठी लगतच्या खाडीतील तिवराच्या शेकडो झाडांची कत्तल केली, म्हणून महापालिकेला त्याच्यावर कठोर कारवाई करावी लागलेली होती. त्याबदल कपील शर्माने एकदाही माफ़ी मागितलेली नाही. म्हणजेच पर्यावरणाचा नाश करण्याला ज्याने हातभार लावला, त्याच्याच कार्यक्रमाला श्रद्धा कपूर पोहोचली होती. तीच गोष्ट सुप्रिया सुळेंची. पवार साहेबांनी संपूर्ण लवासा शहर वसवताना पर्यावरणाचा किती ऱ्हास झाला असेल याची मोजदाद कशी करायची? पण त्यांचीच कन्या म्हणते आम्ही आरेचा लढा देऊ. च्यायला ही काय मस्करी चालली आहे? एका बाजूला पर्यावरण नाशाला पाठीशी घालायचे आणि दुसरीकडे त्याच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आंदोलनात सहभागी व्हायचे. त्यामुळे मुख्य मुद्दा विषयातल्या गांभिर्याचा आहे आणि जो कोणाचकडे नाही.

मुंबईत लोकल ट्रेन्स ही जीवनवाहिनी समजली जाते. दररोज लक्षावधी लोक प्रवास करीत असतात, जीव अक्षरशः मुठीत घेऊन प्रवास करतात. रस्ते वाहतुकीवर दिवसेंदिवस वाढत्या वाहनसंख्येचा ताण असह्य होत चालला आहे. गर्दीमुळे लोकलमधून पडून माणसे मृत्युमुखी पडत आहेत. ट्रॅफिक जॅम मध्ये वेळ आणि इंधन फुकट जात आहे. यातून सुटका म्हणून अनेक मेट्रो प्रोजेक्ट्स पुढे आली. असंख्य रुट्स कल्पकतेने तयार करण्यात आले आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाकांक्षी संपूर्णपणे भूमिगत अशा मेट्रो हा प्रकल्प आहे. मुख्य गरज महत्वाची ठिकाणे जोडणे ही आहे. एक नजर या रूटवर टाकली तर खऱ्या मुंबईकराला याची उपयुक्तता लगेच कळून येईल. मेट्रो या मार्गामुळे रोजची होणारी इंधनाची बचत, लोकांची होणारी वेळेची बचत, लोकांना मिळणाऱ्या सुविधा, रेल्वेवर कमी होणारा ताण या आणि अशाच गोष्टींचा विचार प्रामुख्याने करायला हवा. मुंबईकरांचा दिवसाचा प्रवास सुखकर होण्यासाठी मेट्रो होणे आवश्यक आहे. आणि कारशेड तयार झाल्याशिवाय मार्ग सुरू होऊच शकत नाही. 

कार्बन डायॉक्साईडच्या उत्सर्गात होणारी घट, दिवसाला किती लाख वाहनांच्या खेपा कमी होतील आणि किती लाख लिटर इंधनाची बचत होईल याची आकडेवारी सरकारने जाहीर केलीच आहे त्यामुळे ती काही मी परत लिहीत बसत नाही. 

फायदे खूप आहेत आणि जे संभाव्य तोटे आहेत त्यावर सरकार सकारात्मक प्रतिसाद देत नसेल तर जरूर लढा द्या. भविष्यात होणाऱ्या वृक्षारोपणाची अंमलबजावणी व्यवस्थित होत आहे की नाही यावर करडी नजर ठेवली तर ते खरे विधायक कार्य ठरेल. 

या पर्यावरणवाद्यांचे लाडके ब्रीदवाक्य म्हणजे झाडे लावा, झाडे जगवा आणि पर्यावरणाचे रक्षण करा. अशा जाहिराती, सुवचने वाचून बरेच जण आपल्या सोसायटीत शुद्ध हवा यावी या हेतूने झाडे लावतात पण भविष्यात त्याचा किती मनस्ताप होऊ शकतो याचा त्यांना अंदाजच नसतो. ती झाडे कापणे, फांद्यांची विल्हेवाट लावणे हा मोठा यक्षप्रश्न आहे. त्यामुळे मला नेहमी या वृक्षप्रेमी मंडळींना सांगावेसे वाटते की कृपा करून विचार करा आणि मगच झाडे लावा.

परंतु अनेक पर्यावरण प्रेमी हे त्या प्रेमाने आंधळे, अधिक भाबडे होतात. मुळात मलाविकास म्हणजे विनाशही संकल्पनाच पटत नाही. दोन्ही गोष्टी सापेक्ष असतात. आणि माणसाचा विकास नेहमीच पर्यावरणाच्या विनाशाला सोबत घेऊन येतो असं मला वाटत नाही. अनेकदा पर्यावरणवादी धरणेच बांधायला नकोत वगैरे म्हणतात ते काही मला पटत नाही. माणसाने स्वतःच्या फायद्यासाठी नदीचा उपयोग करून घेऊच नये असंही मला वाटत नाही. हल्ली इतर सर्व गोष्टींप्रमाणेच एकूण पर्यावरण किंवा कुठल्याही सामाजिक संस्था चळवळी फार दिखावू झाल्या आहेत असे लक्षात येते. कोणी कोर्टात धाव घेतो, कोणी कॅमेरे बोलावून आंदोलने करतो, कोणी प्रचारकी गाणी लिहीतोम्हणतो. त्यातून लोक नामवंत होतात. परंतु निसर्गाला काडीमात्र फरक पडत नाही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नुसत्या चळवळी, आंदोलने आणि लढे देऊन काय होणार ? त्यातून मार्ग काय हे कोणीही सांगत नाही. त्यामुळे आरे कॉलनी सारख्या सर्व चळवळी राजकीयदृष्ट्या प्रेरित असतात की काय अशी शंका येऊ लागली आहे. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायला हवी की जेव्हा विरोधासाठी विरोध होतो आणि तो विकासाच्या मार्गात फक्त खोडाच घालण्यासाठी आहे असे वाटू लागते, तेव्हा मात्र मग त्याच्यातील गांभीर्य निघून जाते.

कोलंबियाच्या गुस्टावो पेट्रो याचे एक अतिशय सुप्रसिद्ध वाक्य आहेA Developed Country is not a place where poor have the cars. It is where the rich use Public Transportation