तीस पस्तीस वर्षांपूर्वी मुंबईत टू व्हिलर्स खूपच कमी दिसायच्या आणि पुण्याला वगैरे गेलं की तिकडची दुचाकी वाहनांची गर्दी बघून दडपण यायचे. वाटायचं की बरं आहे की मुंबईत अशी गर्दी नाही. त्यावेळी असेही म्हटले जायचे की मुंबईतील ट्रॅफिकचा वेग बराच जास्त असल्याने दुचाकी वाहने कमी आहेत आणि राहतील.

परंतु हळूहळू अशी वाहने मुंबईत वाढू लागली. हिरो, बजाज, होंडा, कायनेटिक, टीव्हीएस, यामाहा अशी नुसती रेलचेल आहे. आता गेल्या पाच वर्षात तर दुचाकींची धुमश्चक्री झाली आहे. जशी ही वाहने वाढतायेत त्याच प्रमाणात मुंबईतील ट्रॅफिक दिवसेंदिवस बेशिस्त होऊ लागला आहे.

प्रत्येक शहरातील लोकांना असे वाटत असते की आपल्या शहरासारखा वाईट ट्रॅफिक भारतातील कुठल्याच शहरात नसणार. पूर्वी मला असा अभिमान होता की मला मुंबईच्या ट्रॅफिकबद्दल कधीच असे वाटणार नाही पण गेल्या २-३ वर्षात त्या अभिमानाच्या पार चिंधड्या झाल्या आहेत. आणि त्याचे प्रमुख कारण ही दुचाकी वाहने आहेत.

ट्रॅफिकचे कुठचेही नियम पाळण्यासाठी असतात याच्यावर या चालकांचा विश्वासच नसावा बहुदा. सगळ्या गोष्टी घाब्यावर बसवणं हा यांचा लाडका छंद. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरावे हे सुद्धा यांना मान्य नाही; दहा वेळेला पोलिसांनी त्यासाठी अडवले तरी चालेल पण मी हेल्मेट घालणार नाही हा अट्टाहास. हेल्मेट न घालण्यासाठी पुण्यात आंदोलने होतात. कशासाठी यांच्या सुरक्षेचा विचार सरकारने आणि पोलिसांनी करायचा? होऊ देत अपघात. शंभर लोक मरतील तेव्हा कदाचित यांचे डोळे उघडतील आणि नाही उघडले तर मरू देत.

(फोटो सौजन्य: जयेंद्र साळगावकर, स्थळ: टिळक ब्रिज, मुंबई)

हल्ली मुंबईत तर ही दुचाकी वाहने काय करतील याचा नेमच राहिलेला नाही. कुठलाही रस्ता आणि रस्त्याची कुठचीही बाजू यांच्या बापाचीच असावी अशा थाटात सगळा कारभार चालू असतो. नो एन्ट्रीचे बोर्ड यांच्यासाठी नसतातच. कुठल्याही सिग्नलला थांबणे जणू अक्षम्य गुन्हाच. आपल्याला जायचा रस्ता जॅम आहे, काहीच अडचण नाही; घुसव विरुद्ध येणाऱ्या ट्रॅकमध्ये. फुटपाथवरून चालवणे हा तर यांचा जन्मसिद्ध हक्कच आहे. चालवताना फोन कानाला लावून मान वाकडी करून बोललो तर त्यात काय मोठं? माझी किती महत्वाची कामे असतात तुम्हाला काय कळणार? समोरची गाडी इंडिकेटर देऊन डावीकडे वळते आहे; माझा काय संबंध. मी तरीही त्या गाडीला डावीकडूनच ओव्हरटेक करणार. आणि जर काही बारीकसा जरी अपघात झाला तर मारामारी करायला लगेच तयार. जेवढी समोरची गाडी मोठी, तेवढी यांची जास्त दादागिरी.

त्याच्या व्यतिरिक्त प्रचंड वेगात चालवणे, ट्रीपल सीट जाणे, पोलिसांना हैराण करणे ह्या गोष्टी तर असतातच. जे जे हॉस्पिटलच्या ब्रिजवर दुचाकी वाहनांना परवानगी नाही पण मी माझ्या डोळ्याने बघितलंय की अडवणाऱ्या पोलिसाला बाजूला धुडकारून बेमुर्वतखोरपणे ब्रिजवर वाहने घालायची. दुसरा एक भयाण प्रकार म्हणजे रात्री या ब्रिजवर शर्यती लागतात. त्याशिवाय लांबच्या पल्ल्याच्या शर्यती रात्री असतातच. त्यावेळी ज्या वेगात वाहने चालवली जातात ते बघून सुद्धा अंगावर काटा येतो. जरा रिकामा रस्ता दिसला की ही मुले wheelie करतात.

ह्यात धर्माचा काही संबंध नाही पण असले सगळे अघोरी प्रकार करण्यात तरुण मुसलमान मुले सगळ्यात अग्रेसर आहेत. काही महिन्यांपूर्वी माझ्या घराजवळ दुचाकी वाहनांचे ४ दिवसात ३ जीवघेणे अपघात झाले आणि ७-८ तरुण मुसलमान मुले मृत्युमुखी पडली. खरंच आयुष्य एवढं स्वस्त झालंय की ज्याची कोणालाच पर्वा नाही?

हे सगळं कसं थांबणार? कठीण आहे कारण दिवसेंदिवस आम्हाला कायद्याची भीती वाटणेच बंद झाले आहे. बहुदा हे प्रकार वाढतच जाणार अशी आजची स्थिती आहे.

यशवंत मराठे

#traffic #TwoWheelers #helmets #wheelie #hero #bajaj