सत्यनारायण अशी खरोखरच देवता आहे का? कुठून आली ही देवता?

सत्यनारायणाची महापूजा हे मुळात मनकामनापूर्ती हेतू ठेऊन केलेली एक पूजा.

ही पूजा तशी एकदम सोपी. फारशी तयारी लागत नाही, पूजेचे मुहूर्त भरपूर, वेळकाळाचं फार बंधन नाही त्यामुळे ही पूजा लोकप्रिय होणे स्वाभाविकच. एक चौरंग, चार केळीचे खुंट, गहू, पाण्याचा कलश, नवग्रहांच्या आणि अष्टदिशांच्या सुपाऱ्या, शाळिग्राम वा बाळकृष्णाची मूर्ती, प्रसादासाठी केळीयुक्त शिरा, पंचामृत, पोथी सांगणारा पुरोहित आणि सार्वजनिक पूजा असली तर लाऊडस्पीकर नाहीतर नाही एवढीच काय ती तयारी. एकदा ही पूजा झाली की नंतर वर्षभर त्या सत्यनारायणाकडे ढुंकूनही पाहिले नाही तरी चालते. एकंदर या पूजेत अटी आणि शर्ती फारशा नाहीतच. प्रसादाचे मनोभावे सेवन हे महत्त्वाचे.

प्रत्येक मंगलकार्यानंतर किंवा नवस फळला की ही पूजा करण्याची पद्धत आहे. तशी ती कधीही, कोठेही, कोणीही केली तरी चालते. महाराष्ट्रातील विविध छोटी-मोठी सरकारी कार्यालये तर सोडाच, अगदी मंत्रालयातही ही महापूजा मोठ्या श्रद्धेने व डामडौलाने केली जाते. मुंबईतील उरल्या-सुरल्या चाळींमध्ये आणि मध्यमवर्गीयांच्या सोसायट्यांमध्ये प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिन असा सुट्टीच्या दिवशी या पूजेचा मुहूर्त असतो.

पण गेली साधारणत: दोन-अडीचशे वर्षे अत्यंत लोकप्रिय असलेली ही पूजा त्या आधीच्या धार्मिक जीवनाचा भाग नव्हती. ही पूजा शिवकालात नव्हती. छत्रपतींच्या कारकीर्दीत अनेक – विवाह समारंभापासून किल्ले उभारणीपर्यंत – मंगलकार्ये झाली. परंतु शिवाजी महाराजांनी कधी सत्यनारायण केल्याचे उल्लेख नाहीत. अगदी पेशवाईतसुद्धा ही पूजा केली जात नव्हती. पेशवाईत महाराष्ट्रात त्यामानाने व्रतवैकल्यांचा आणि कर्मकांडाचा सुळसुळाट झाला होता. त्या काळात येथे यज्ञ, अनुष्ठाने, गोप्रदान, ब्राह्मणांकरवी उपोषण, दाने अशी कृत्ये केली जातच. व्रतांना तर काही सुमारच नव्हता. अदु:खनवमी व्रत, ऋषिपंचमी व्रत, शाकाव्रत, मौन्यव्रत, तेलव्रत, रांगोळीचे उद्यापन, प्रतिपदा व्रत, तृतीय व्रत, संकष्टी चतुर्थी व्रत, भोपळे व्रत, गोकुळअष्टमी व्रत, रथसप्तमी व्रत अशी तेव्हाच्या व्रतांची यादीच चापेकरांच्या संशोधनग्रंथात दिली आहे. पण त्यात कुठेही कोणी सत्यनारायण केल्याचे नमूद नाही. मग ही पूजा आली कोठून?

सत्यनारायणाची कथा स्कंद पुराणाच्या रेवाखंडात असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्ष विष्णूने नारदमुनींना सांगितलेले हे व्रत आहे असे ते पुराण म्हणते. हा स्कंद म्हणजे शिवाचा पुत्र, त्याच्या नावाने हे पुराण प्रसिद्ध आहे. पण ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर केतकरांच्या मते स्कंद पुराण असे नाव असलेली आज एकही रचना उपलब्ध नाही. मग आज जे स्कंद पुराण आहे ते काय आहे? केतकर सांगतात, माहात्म्ये, स्तोत्रे, कल्पे वगैरे मोठा ग्रंथसंग्रह स्कंद पुराण या नावाखाली मोडतो आणि एकंदरच एखाद्या स्थळाचे वा गोष्टीचे माहात्म्य वाढवायचे असल्यास त्यावर एक पुराण रचून ते स्कंद पुराणातील म्हणून दडपून सांगतात व अशा रीतीने स्कंद पुराण फुगलेले आहे. हे ज्ञानकोशकार केतकरांचे मत. आता सत्यनारायणाचे व्रत अगदी दोन-अडीचशे वर्षांपूर्वीपर्यंत नव्हते आणि स्कंद पुराणात कथा, माहात्म्ये घुसडली जातात या दोन गोष्टी एकत्र पाहिल्या की सत्यनारायण कथेवरील प्राचीनतेचे वलय गळून पडते. ही कथा आणि खरे तर देवताच नंतर कोणी तरी घुसडली असल्याचे दिसते. कारण या देवतेचा उल्लेख हिंदूंच्या अन्य कोणत्याही प्राचीन धार्मिक ग्रंथात नाही. तेव्हा प्रश्न असा येतो की या देवतेस कोणी जन्मास घातले? सत्यनारायणाची कथा मुळात आली कोठून?

तर त्याचे उत्तर आहे – बंगालमधून. तेथील एका मुस्लिम पीराच्या कथेमधून. तिचे नाव – सत्यपीरेर कथा.

मराठी विश्वकोश याबद्दल सांगतो, की हिंदू व मुसलमान या दोन प्रमुख धर्ममतांच्या अनुयायांच्या सहजीवनातून धर्मकथांच्या मिलाफाची प्रक्रिया आकारास आली आणि सत्यपीर व सत्यनारायण या व्रतकथांचा जन्म झाला. सत्यपीराच्या परंपरेवर लिहिणारांत मुसलमानांहून अधिक हिंदू आहेत यात म्हणूनच काहीही आश्चर्य नाही. तर यातीलच कोणा चलाख गृहस्थाने सत्यनारायणाच्या या कथेला प्राचीनतेची आभा चढावी म्हणून ती स्कंद पुराणाच्या रेवाखंडात घुसडून दिली. बहुसंख्य हिंदू धार्मिक बाबतीत अडाणीच असतात. त्यामुळे त्याचे व त्याच्यासारख्या अनेकांचे व्यवस्थित फावले इतकेच.

सत्यपीरातून उत्क्रांत झालेली सत्यनारायणाची ही कथा अठराव्या शतकापासून महाराष्ट्रात गायली जाऊ लागली होती.

तशा व्रतकथा महाराष्ट्रात काही कमी झाल्या नाहीत. एक चित्रपट येतो आणि आपल्याकडे संतोषीमातेच्या पूजेची लाट येते. एखादा बडा व्यावसायिक येतो आणि शनिपूजेला मानाचे स्थान देऊन जातो. पण अशा पूजा शतकानुशतके टिकत नसतात. पण सत्यनारायणाची टिकली याचा अर्थ त्यात सर्वसामान्यांना आकर्षित करून घेणारे काहीतरी आहे. या कथेत नेहमी पुराण कथांमध्ये आढळणारा दरिद्री ब्राह्मण आहे, मोळीविक्या म्हणजेच शूद्र आहे, क्षत्रिय राजा आहे आणि साधू नावाचा वाणी म्हणजे वैश्य आहे. एकंदर सत्यनारायण ही देवता चारही वर्णाचे भले करणारी आहे.

सत्यनारायण ही एक पटकन चिडणारी परंतु स्वतःची स्तुती करणाऱ्या कथा वाचनाने किंवा प्रसाद ग्रहण करण्याने लगेच संतुष्ट होणारी देवता की जी बुडालेली जहाजेही पण वर आणून देते अशी मान्यता असणे हीच सगळ्यात गमंत आहे. मी स्वतः तसा व्रत वैकल्यापासून चार हात लांबच असतो आणि वरील सर्व गोष्टींमुळे माझे सत्यनारायण या पूजेत कधी मन रमले नाही. दुसरी मला या पुजेबाबत न पटणारी गोष्ट म्हणजे विष्णू सहत्रनामोच्चरणाबरोबर देवतेला १००० तुळशीची पाने वाहणे. बरं, एक पान म्हणजे ४-५ पाने एकत्र असलेली तुळशीची मंजिरी असते म्हणजे जवळजवळ ४००० ते ५००० पाने वाहिली जातात. मला कळत नाही की अशी तुळशी ओरबाडून काढण्यापेक्षा प्रतीकात्मक सर्वात शेवटी एक पान का नाही वाहायचं?

सत्यनारायणाच्या लोकप्रियतेचे खरे गमक म्हणजे कधीही पूजा केली तरी चालते आणि त्याचा प्रसाद सेवन केला की कार्यभाग साधतो ह्या धारणेमागे आहे. एका इस्लामी दंतकथेपासून तयार झालेली ही कथा आज हिंदूंची महत्त्वाची धार्मिक खूण बनली आहे.

एकंदर सत्यनारायणाच्या कथेइतकाच त्याचा इतिहास मोठा रंजक आहे.

(ज्यांचा या पूजेवर विश्वास आहे मला त्यांच्याबद्दल काहीच म्हणायचे नाही. कोणाची कशावर श्रद्धा असावी हा सर्वस्वी वैयक्तिक निर्णय असतो आणि त्याचा मला आदर आहे.)

यशवंत मराठे

#rituals #puja #satyanarayan #सत्यनारायण