दोन ऑक्टोबरला लक्षात आलं की, अरे, मुंबईत टीव्ही प्रसारणाला सुरुवात होऊन ४६ वर्षे झाली की. सगळ्या जुन्या आठवणींची मनात एकदम गर्दी झाली.
आजच्या आपल्या या युगात आपण आपले जग टीव्ही शिवाय कल्पना करू शकतो का? एकही सिरीयल नाही, क्रिकेट मॅच नाही, न्यूज चॅनल्स नाहीत.. आपल्याला शक्य होईल? मग तसे जग खूप कंटाळवाणे असेल का? आज टीव्ही आपल्या जगण्याचा एक अविभाज्य घटक बनला आहे. आपला आवडता कार्यक्रम बघताना दुसऱ्या कोणी, अगदी जवळच्या माणसाने सुद्धा, थोडंसं डिस्टर्ब केलं तरी आपल्याला त्रास होतो आणि मानसिक संताप येतो.
परंतु टीव्हीचा शोध हा काही फार जुन्या काळातील नाही. माझ्या पिढीतील अनेक जणांच्या आजोबांनी टीव्ही कधी आयुष्यात बघितलाच नसेल. माझ्या बाबतीतच बोलायचं तर मी देखील आयुष्याची पहिली १२ वर्षे टीव्ही शिवाय काढलीच की! मग ते माझं आयुष्य कंटाळवाणं होतं का? तर अजिबातच नाही.
इतिहास
जॉन बेअर्ड यांना टीव्हीचे जनक मानावे लागेल. १९३६ साली बीबीसी ने पहिले टीव्ही प्रसारण सुरु केले. भारतात, दिल्लीत टीव्ही यायला १९६५ पर्यंत वाट बघावी लागली. परंतु आम्हां मुंबईकरांना टीव्हीचे आगमन व्हायला अजून ७ वर्षे वाट बघावी लागली आणि अखेरीस १९७२ साली मुंबईमध्ये प्रसारणाला सुरुवात झाली.
परंतु असं जाणवलं की पहिल्या २० वर्षात टीव्हीशी जेवढी भावनिक जवळीक आणि आपलेपणा होता तो नंतरच्या झगमगाटात कुठेतरी लुप्त झाला.
पहिली १० वर्षे
मुंबईत प्रसारण २ ऑक्टोबर १९७२ रोजी सुरु होणार असले तरी टीव्ही सेट्स मात्र १-२ महिने आधीपासून विकायला सुरुवात झाली होती. माझ्या आठवणीनुसार आमच्याकडे साधारण महिनाभर आधी टेलीरॅड (Telerad – Tele Radio) ब्रँडचा टीव्ही घरी आला. त्याला सन्मानपूर्वक खास जागी बसवण्यात आले. मग लगेच गच्चीत अँटेना पण लावण्यात आली. नंतरचे बरेच दिवस आम्ही काहीही दिसत नसताना देखील उगाचच टीव्ही ऑन करायचो. मग २ ऑक्टोबरच्या आधी ८-१० दिवस टेस्ट सिग्नल या नावाखाली काहीतरी दिसायला लागलं. एकच कुठलं तरी कार्टून परत परत दाखवायचे आणि आम्ही ते न कंटाळता बघत बसायचो. कार्टून कसले तर एक मोठा मासा छोट्या माशाला गिळंकृत करतो म्हणून मग बरेच छोटे मासे एकत्र येऊन आपण त्याहूनही मोठे असल्याचा आभास निर्माण करतात आणि ते बघून मोठा मासा पळून जातो. जास्तीत जास्त ५ मिनिटात ते संपायचे. अखेरीस वाट बघणे संपून २ ऑक्टोबर उजाडला. आमच्या सोसायटीत अगदी १-२ जणांकडेच टीव्ही आला होता पण बघायचं तर सर्वांनाच होते. आमच्या घराचा हॉल तुडुंब भरला होता. तळमजल्यावर रहात असल्याने खिडकीत पण बरेच जण उभे होते. बाबा गंमतीत म्हणाले अरे, स्टॉल आणि बाल्कनी एकदम हाऊस फुल्ल झालंय.
सुरुवातीचे काही महिने दिवसातून २-३ तास प्रसारण चालायचं. नंतर ते हळूहळू वाढू लागलं पण खरं म्हणजे आम्हांला आवडेल असा एकही प्रोग्रॅम नसायचा तरी देखील हलती चित्र बघायला आम्ही टीव्हीला चिकटून असायचो. पहिले काही कार्यक्रम कुठचे तर कामगार विश्व, आमची माती आमची माणसं आणि गजरा. बरं तसा प्रायोजित कार्यक्रम एकही नाही; सगळेच दूरदर्शनच्या वरळी स्टुडियो मध्ये रेकॉर्ड केलेले असायचे. नंतर साप्ताहिकी सुरु झाली ती तर कौतुकाने बघायची कारण मग पुढील आठवड्यातील कार्यक्रम कळायचे. बातम्या होत्या पण त्यावेळी वयाच्या बाराव्या वर्षी त्यातील इंटरेस्ट तितपतच होता. काही महिन्यांनंतर मग किलबिल, शनिवारी किंवा रविवारी सिनेमा, गुरुवारी छायागीत जरा बरे असे प्रोग्रॅम चालू झाले. १९७६ साली आणखीन कार्यक्रम वाढू लागले. आता सांगून कोणालाही पटणार नाही पण त्याकाळी टीव्ही साठी वेगळं लायसन्स घ्यावे लागे ज्याचे एक छोटं पुस्तक होतं.
१९७२ ते १९८२ या दहा वर्षातील मला आठवणारे कार्यक्रम असे होते (थोड्याफार चुका असू शकतात)
मराठी – गजरा, चिमणराव आणि गुंड्याभाऊ, साप्ताहिकी, आमची माती आमची माणसं, किलबिल, बातम्या, कामगार विश्व आणि कधीतरी लागणारा मराठी सिनेमा.
हिंदी – छायागीत, फुल खिले है गुलशन गुलशन, समाचार आणि रविवारचा सिनेमा
गुजराथी – संताकुकडी, आवो मारे साथे
इंग्रजी – Magic World, What’s the Good Word
International – Charlie Chaplin, Here’s Lucy, Invisible Man, Fire Ball
कालांतराने आमच्या सोसायटीत बऱ्याच लोकांकडे टीव्ही आले त्यामुळे स्टॉल मोकळा होऊ लागला पण बाल्कनी मात्र कायम फुल्ल असायची कारण त्यावेळी कोकणातील बरीच गडी माणसं आमच्या सोसायटीत रहायची आणि त्यांना बघण्यासाठी सगळ्यात सोयीचे घर आमचेच होते. आम्ही कधीच कोणाला आडकाठी केली नाही.
त्यावेळी होणारी दुसरी मोठी गंमत म्हणजे जरा जोरात वारा सुटला की गच्चीत लावलेली अँटेना हलायची आणि ती हलली की मग चित्र दिसण्याची बोंब. धावत गच्चीत जायचं आणि त्या अँटेनाचा अँगल बदलायचा आणि वरूनच ओरडून विचारायचं आले का रे चित्र? नुसता गोंधळ कारण असं करणारे आम्ही ५-६ जण असायचो त्यामुळे कोण कोणाला विचारतोय हे कळायलाच आधी वेळ लागायचा. त्यात आम्ही समुद्रकिनाऱ्याच्या बिल्डिंगमध्ये रहाणारे आणि त्यामुळे वारा भरपूर. सगळाच आनंदी आनंद असायचा.
तसेच प्रसारण चालू असताना मधेच ते अनेक वेळा तांत्रिक घोळामुळे बंद पडायचं आणि रुकावट के लिये खेद है किंवा व्यत्यय अशा त्यावेळच्या सुप्रसिद्ध पाट्या टीव्हीवर झळकायच्या. कधी ५ मिनिटं, कधी १० मिनिटं आणि कधी त्याहूनही जास्त. ती खरी आमच्या संयमाची परीक्षा असायची पण काहीही न बोलता सगळे शांतपणे वाट बघत बसायचे.
त्याकाळातील काही लोक टीव्ही मुळे खूपच लोकप्रिय झाले, उदा. सलमा सुलतान, कमलेश्वर, सुधा चोप्रा, टी पी जैन, मिनू तलवार, रिती खन्ना, ज्योत्स्ना राय, वेद प्रकाश, डॉ अशोक रानडे, भक्ती बर्वे, स्मिता पाटील, लुकू संन्याल, बबन प्रभू, याकूब सईद, सुहासिनी मुळगांवकर आणि तल्यारखान (AFS) अशी काही वानगीदाखल नावे.
तसेच त्यावेळच्या आठवणाऱ्या काही जाहिराती त्या म्हणजे थम्प्स अप, फॅबिना, बाबुभाई जगजीवनदास, विको टरमेरिक, आणि पालमोलिव्ह (सुनील गावस्कर)
१९८२ साली टीव्ही हा कृष्णधवल न रहाता त्याचे रूपांतर रंगात झाले. १५ ऑगस्ट १९८२ चे प्रधानमंत्री इंदिरा गांधींचे स्वतंत्रता दिनाचे भाषण पहिल्यांदा रंगीबेरंगी झाले आणि पाठोपाठ १९८२ च्या आशियाई खेळांच्या निमित्ताने रंगीत टीव्ही भारतात सुरु झाला.
लेख फार मोठा झाला तर लोकांचा वाचण्यातील उत्साह टिकून रहात नाही त्यामुळे पुढील १० वर्षांच्या कालखंडात काय काय घडले ते पुढच्या लेखात बघूया. चालेल ना?
यशवंत मराठे
#reminiscence #television #doordarshan
याकूब सैद आणी बबन प्रभू यांचा पण एक farsikal acharat कार्यक्रम असायचा. प्रिया तेंडुलकर नंतर पॉप्युलर झाली होती. पण एक वेगळा जमाना होता.
LikeLike
माझ्यामते तो कार्यक्रम गजरा असावा.
LikeLike
Great information . Recollecting old memories of watching TV TV Serials.
LikeLike
Very nicely written blog. I was 17 years old at that time and our family could not afford TV. But I remember going to my auntie’s place for watching a Sunday movie.
The blog evoked nostalgic memories of a day and time long past!
LikeLike