दर वर्षी २७ फेब्रुवारी मराठी दिन (जागतिक म्हणायला पाहिजे, नाही का?) साजरा केला जातो. कुसुमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा दिवस गौरव दिन मानला जातो.

त्या दिवशी मग सोशल मीडियावर मराठीची महती, कशी मराठी भाषा लोप पावू लागली आहे, कसे तिचे जतन करायला हवे अशा पोस्टचा नुसता पाऊस पडतो. दुसऱ्या दिवशी परत सगळे विसरतात, कामाला लागतात ते पुढील २७ फेब्रुवारी पर्यंत. मग पुन्हा तेच गुऱ्हाळ. गेले कित्येक वर्षे हेच चालू आहे.

माझ्या मते प्रत्येक भाषा ही प्रवाही होती, असते आणि राहणार. गेल्या ७००-८०० वर्षात या भाषेत किती संक्रमणे झाली असतील? ज्ञानेश्वरांच्या काळातील भाषा आज बोलली तर कोणाला कळेल का? त्यांच्या ज्ञानेश्वरीचा अर्थ अजून लोक लावायचा प्रयत्न करतायेत. आपली आजची भाषा ऐकली तर त्याकाळचे लोकं बेशुद्ध पडतील इतकी ती बदललेली असेल आणि ते स्वाभाविकच आहे.

मराठीच्या मृत्यूची भीती बाळगण्यात माझ्या मते काहीच अर्थ नाही कारण ही सगळी आपली शहरी भूतं आहेत. अशा बातम्या फक्त शहरात चर्चिल्या जातात. ग्रामीण भागात हीच भाषा प्रभावीपणे बोलली जाते यात शंका नाही. शहरात वेगवेगळ्या भाषांच्या संक्रमणामुळे त्यात अनेक शब्द जोडले जातात. पण गावात अस्सल ग्रामीण बाज ठेवून ही भाषा वापरात आहे आणि राहील.

दुसरा एक लाडका विषय म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढत असल्याने मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडणे हा आहे. इंग्रजी शिकण्याची धडपड ही नोकरी मिळविण्यासाठी इंग्रजी आवश्यक आहे, या भावनेतून आहे.

खरं सांगायचं तर ही सगळी प्रतिष्ठेची धडपड आहे. इंग्रजी हे चांगली नोकरी व पर्यायाने उच्च रहाणीमान मिळविण्याचे साधन आहे हे सर्वमान्य झाल्यामुळे हे होणे स्वाभाविक आहे. नोकरी मिळवून देण्यात मराठीला १००% मर्यादा आहेत आणि म्हणून जर इंग्रजीच्या शिक्षणाने नोकरी मिळणार असेल तर ती भाषा शिकलीच पाहिजे. पण त्याकरिता मराठीला लाथाडण्याची काहीच गरज नाही.

आज दुर्दैवाने बऱ्याच मराठी घरांमध्ये सुद्धा मराठी बोलणे कमीपणाचे वाटू लागले आहे. दोन गुजराथी माणसं जगाच्या पाठीवर कुठेही भेटली तरी लगेचच गुजराथीत बोलायला सुरुवात करतात पण दोन मराठी मात्र इंग्रजीत बोलतात. जोपर्यंत हा न्यूनगंड जाणार नाही तोपर्यंत नुसतं बोंबलून डोंबलाचा फरक पडणार? आधी आपण घरात कोणती भाषा बोलतोय हे महत्वाचं आहे. घरी मराठीतच सगळे व्यवहार चालत असतील तर शाळा इंग्रजीत असल्याने काहीही फरक पडत नाही; आणि पुढील पिढी मराठीपासूनही दूर जाणार नाही. तसेच मराठी मरतेय मरतेय म्हणून गळे पण काढायला लागणार नाहीत.

यशवंत मराठे

#marathi #bhasha #language #मराठीदिन