हा लेख खरं म्हणजे मी गेल्या शुक्रवारी तुमच्याबरोबर शेअर करणार होतो पण माझ्या सामाजिक संस्थेच्या मार्फत झालेल्या कामाच्या आनंदात तुम्हाला पण सहभागी करावे असे मनापासून वाटले म्हणून त्याला आधी प्राधान्य दिले..

मी शिवाजी पार्क परिसराविषयी सप्तलेख मालिका ११ मे रोजी संपवली.. काही जणांची अशी तक्रार होती की मी पूर्ण परिसराचा मागोवा घेतला नाही; मला पूर्णपणे ते मान्य आहे कारण तसे करणे अशक्य होते.. ज्या ठिकाणांशी आपला मानसिक connect असतो, त्याबद्दलच लिहिता येऊ शकतं.. (उदा. एखाद्याच्या दृष्टीने महापौर बंगला अथवा शिवसेना भवन ही एवढी मोठी आणि प्रसिद्ध वास्तू असून देखील मी त्यांचा उल्लेख जवळजवळ कुठेच केलेला नाही.. मी ज्या वास्तूत कधी पाऊलच नाही ठेवलं त्याबद्दल काय लिहिणार?) त्यामुळे असे म्हणता येऊ शकेल की ही लेखमालिका शिवाजी पार्क परिसराची नसून ती खास करून ३५-४० वर्षांपूर्वीच्या माझ्या अनुभवांची एक झलक होती; पण त्याला माझा काही पर्यायही नव्हता..

A blog is a very personal expression and as such it is more important that it comes from the heart.. An edited or feedback based corrected or ammended blog will not have the same connect.. 

तसेच मला खूप जणांचे असेही मेसेज आले की मी फार लवकर संपवतो आहे; लिहिण्यासारखे अजून खूप काही आहे.. मी काही एकता कपूर सारखी कधीही न संपणारी कथा लिहित नव्हतो.. Short & sweet as always better.. I must be able to stop when people are asking ‘why’ and not wait till they start asking ‘why not’?

मी तसा काही लेखक वगैरे काही अजिबातच नाही.. २००६ ते २०१७ या एका तपात जेमतेम एखाद-दुसरा लेख लिहिला आणि तो सुद्धा फक्त आपल्यापुरता.. पहिला लेख काही ठिकाणी प्रकाशित झाला पण तो तेवढाच.. नंतर तसे काही लिखाण केले नाही कारण मला असं वाटलं की आपलं लिखाण कोण वाचणार?

२०१८ च्या सुरुवातीला मला असं जाणवत होतं की सध्याची राजकीय मते इतकी परस्परविरोधी आणि टोकाची झाली आहेत की सामान्य मतदाराचे निःपक्षपाती असणे हे बरोबर का चूक हेच कळेनासे झाले आहे म्हणून काहीतरी स्फुर्ती आल्यासारखा मी एक लेख लिहायला घेतला.. विचार केला की निदान आपल्या मित्र परिवारात आणि ओळखीच्या लोकांशी शेअर करू.. कच्चा आराखडा काही मित्रांना पाठवला तर त्यांचे म्हणणे पडलं की लेख खूप चांगला झाला आहे आणि मी तो प्रकाशित होऊ शकतो का याचा प्रयत्न करावा.. कर्मधर्म संयोगाने आणि सुदैवाने तो लेख “मोदी मतदाराचे मनोगत”या शीर्षकाखाली लोकसत्ता वर्तमानपत्रात १५ मार्च २०१८ ला चक्क प्रकाशित झाला आणि माझ्या अपेक्षेपलीकडे त्याचे लोकांनी स्वागत केले.. माझा लेख १५०० पेक्षा जास्त लोकांनी वेगवेगळ्या सोशल मीडियावर शेअर केला.. आणि मी अचानक थोड्याफार प्रमाणात प्रसिद्ध झालो.. शिव्या देणारेही बरेच मेल आले पण बहुतांश लोकांना लेख आवडला, भावला.. मग बऱ्याच लोकांनी मला व्यक्तिशः मेसेज पाठवून मी काहीतरी ब्लॉग लिहावा अशी प्रेमाची मागणी केली.. मी फारसा तयार नव्हतो पण माझा भाऊ, वसंत आणि पुतण्या, ओम हे माझ्या खनपटीसच बसले आणि मी केलंच पाहिजे असा त्यांनी हट्टच धरला.. ओमने तर सिक्सरच मारली आणि मला म्हणाला, kaka you must write as your writing has the power of teleporting the reader to another era.. काकाचं जरा जास्तच कौतुक झालं, नाही का?

सुरुवातीला काय लिहावे हेही लक्षात येत नव्हते, पण तो प्रश्न देखील त्या दोघांनी सोडवला.. पुढची खूप मदत माझा मित्र, शरदमणी मराठे याने केली आणि त्यातूनच “बर्फाचा गोळा ते सागरी सेतू”ह्या शिवाजी पार्क परिसराच्या लेखमालेचा जन्म झाला.. या लेखांना मिळालेला प्रतिसाद माझ्या कल्पनेपलीकडचा होता.. आजपर्यंत दीड महिन्यात १४०० जणांनी माझ्या ब्लॉगला भेट दिली आणि २४०० व्ह्यूज त्याला मिळाले.. काही ओळखीचे लोकं रस्त्यात थांबून विचारू लागले की पुढचा लेख कधी?

माझे लिखाण काही आशयपूर्ण किंवा उदबोधक अजिबातच नाही पण कदाचित माझ्या लिखाणाची शैली लोकांना आवडली असावी.. पण मग आता पुढे काय? लेखन चालू ठेवावे का बंद करावे असा प्रश्न पडला.. विचार केला जोपर्यंत लोकांना आवडतंय तोपर्यंत लिहावे.. बंद तर कधीही करता येईल.. त्यामुळे आता दर आठवड्याला एक लेख लिहिण्याचा मानस आहे.. बघू, काय काय विचार सुचतात ते.. I hope that I can pen it from the heart and go with the flow.. Keeping my fingers crossed..

स्पष्टच सांगायचं तर मराठी भाषेत लिहिणंच मला जास्त सोपं आहे.. बालमोहन मध्ये शिकल्यामुळे असेल पण विचार पहिले मराठीतच सुचतात आणि इंग्रजीत लिहायचे असेल तर मानसिक भाषांतर करावे लागते.. त्यामुळे जास्त लेख मराठीतूनच असतील, अधूनमधून इंग्रजीतून पण लिहिणार आहे..

लेख विविध विषयांवरचे असतील.. 

प्रवास वर्णन (Travelogue), आध्यात्मिक, राजकीय, मित्रांबरोबरच्या गमती, करंट टॉपिक्स, सामाजिक कार्य, व्यक्तिचित्रणे आणि काही नुसताच टाईम पास..

माझ्या ब्लॉगचे नावच मुळी सरमिसळ आहे त्यामुळे एकच विषय असू शकत नाही.. As the tagline of the blog says, it will be collage of my thoughts..

त्यामुळे ज्यांना माझे आजपर्यंतचे लेख आवडले त्यांनी पुढे येणारे एन्जॉय करा, फॉरवर्ड करा आणि ज्यांना आवडले नाही किंवा आवडणार नाहीत त्यांनी डिलीट करा..

चला, असेच आता भेटत राहू..

यशवंत मराठे

#yeshwant #marathe #blog #सरमिसळ